Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेनशेची औषधे बेकायदेशीरपणे विकल्यास करणार गजाआड

नशेची औषधे बेकायदेशीरपणे विकल्यास करणार गजाआड

औषध दुकानदारांना पोलीस प्रशासनाचा इशारा

सोनू शिंदे

उल्हासनगर : नशेखोरांनी उल्हासनगर शहरात हैदोस घातला आहे. या नशेखोरांना नशेचे साहित्य मिळू नये, यासाठी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी औषध विक्रेत्यांची बैठक बोलावत नशेची औषधे बेकायदेशीररीत्या विकणाऱ्या दुकानदारांना दम भरला आहे. एखादा दुकानदार नशेची औषधे विकताना पकडला गेल्यास त्याचे दुकान सील करून त्याची पदवीदेखील रद्द केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी राजेश चौधरी यांनी सांगितले.

मागील सहा महिन्यात खून, जीवघेणे हल्ला, मारामारी, लुटमारी, पोलिसांना मारहाण अशा अनेक गुन्ह्यांत नशेखोरांचा सहभाग होता. गुन्हे वाढण्याला नशेची औषधे कारणीभूत असून ही औषधे औषध दुकानांतून उपलब्ध होत असल्याची प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाकडे आहे. असे असले तरी पोलीस प्रशासनाला औषध दुकानदारांवर कारवाई करणे कठीण जात होते. यावर उपाय म्हणून पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी ही व्यथा अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त राजेश चौधरी यांच्याकडे मांडली. त्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत औषध विक्रेत्यांची बैठक नुकतीच बोलावली.

या बैठकीत अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त राजेश चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पुढची पिढी बरबाद होण्यापासून वाचविण्यासाठी जागृत राहणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. तुमच्या कुटुंबातही तरुण वर्ग असणार. तोही नशेच्या औषधांच्या आहारी जाऊ शकतो. त्यामुळे नशेसाठी वापर होणारी औषधे बेकायदेशीर पद्धतीने विकणार नाही, अशी शपथ घ्या. जर कोणी दुकानदार नशेची औषधे बेकायदेशीरपणे विकताना दिसून आला, तर त्याच्या दुकानाचा परवाना निलंबित न करता थेट दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल, तसेच त्या दुकानदाराची फार्मासिस्टची पदवीदेखील रद्द करण्यात येईल, असा इशारा चौधरी यांनी दुकानदारांना दिला. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दुकानदारांना मार्गदर्शन करताना दिलखुश सिंग या गुन्हेगाराने नशेच्या अधिन राहून केलेल्या कृत्याचे उदाहरण दिले. या नशेकऱ्याने त्याच्या नशेखोर मित्रांसह एका कार्यालयावर दगडफेक केली. एकाला भोसकले, एकाची गाडी फोडली, एकाचे गाडीसकट अपहरण केले आणि अडवणाऱ्या पोलिसावर जिवघेणा हल्ला केला.

त्याला पोलीस कर्मचाऱ्यांनी पकडले तेव्हा त्याने सांगितले, की बटन म्हणजे नायट्रो-१०चे व्यसन केले होते. त्याने या नशेच्या अधिन राहून काय केले, तेही नशा उतरल्यावर माहीत नव्हते.

नशेच्या आहारी गेल्यामुळे उत्तम शिक्षीत तरुणही चोरीचे गुन्हे करतात. हे सांगताना मोहिते यांनी अंबरनाथमध्ये नशेच्या अधिन गेलेल्या तरुणाने मोबाईल दुकान फोडून १० लाखांचे मोबाईल चोरल्याचे सांगितले. आज जे दुकानदार नशेची औषधे विकत आहेत, त्यांच्या घरातील युवा वर्ग भविष्यात नशेखोर होऊ शकतो. त्यामुळे ज्या औषधांच्या सेवनाने नशा होते, ती औषधे डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय देऊ नका, असे कडक शब्दांत मोहिते यांनी दुकानदारांना दम भरत सांगितले. तसेच डमी ग्राहक पाठवून तपासणी केली जाईल, माध्यम प्रतिनिधींकडून माहिती घेतली जाईल, जे केमिस्ट नियम मोडतील, त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, असे कडक शब्दांत मोहिते यांनी सुनावले.

यावेळी सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड, जगदीश सातव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, राजेंद्र कदम, राजेश कोते, संजय गायकवाड, मधुकर भोगे, लक्ष्मण सारीपुत्र, दत्ता गावडे, सोंडे, उल्हासनगर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विजय शिवनानी, मनोज पाटील, ठाकूर बच्चवानी, अंबरनाथ केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय जुमानी, बदलापूर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष ललित वाघुळदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -