कल्याण (वार्ताहर) : एका तरुणीला चेहऱ्यावर ॲसिड टाकण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग करणाऱ्या माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर याच्या विरोधात सप्टेंबर महिन्यात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल अडीच महिन्यांनी फरार आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विनयभंगप्रकरणी २०१९ ते ६ सप्टेंबर २०२१ या दोन वर्षांपासून आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकर कल्याणच्या अनेक रस्त्यांवर अडवून पीडित तरुणीला त्रास देत होता. तो वेळोवेळी तिचा चारचाकी वाहनाने पाठलाग करून तिची समाजात व नातेवाइकांत बदनामी करण्याची धमकी देत होता. तसेच तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकून चेहरा खराब करीन, तुला सोडणार नसून तिला व तिच्या मित्र-परिवारास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ करत विनयभंग करीत असल्याचा आरोप पीडित तरुणीने तिच्या फिर्यादीत केला होता. तसेच तिच्या जुन्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अश्लिल मेसेज व फोटो टाकून सोशल अकाऊंट आणि व्हाट्सअॅपवर बदनामी केली असल्याचा आरोपही महिलेने आपल्या फिर्यादीत नमूद केला होता. या प्रकरणी हायकोर्टात जामीन मिळण्यासाठी आरोपीने अर्ज दाखल केला होता, मात्र कोर्टाने जामीन नामंजूर केला.