Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडीमहत्वाची बातमी

मुंबईतील शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर

मुंबईतील शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर

मुंबई : राज्यात गेल्या दीड वर्षाहून जास्त काळ कोरोनामुळे शाळा बंद आहेत. या शाळांमधील पहिलीपासूनचे सर्व वर्ग येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यानुसार स्थानिक पातळीवर सर्व तयारी देखील झाली होती. मात्र, त्यापाठोपाठ ओमायक्रॉन नावाचा कोरोनाचा नवा विषाणू दक्षिण अफ्रिकेत आढळल्यानंतर त्याचा फटका शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला देखील बसला आहे. राज्य सरकारने जरी शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय कायम असल्याचे जाहीर केले असले, तरी स्थानिक पातळीवर मात्र शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकल्याचे चित्र मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक महानगर पालिकांमध्ये दिसून येत आहे.

मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. त्यामुळे मुंबई महापालिकेने शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी १५ दिवस लांबणीवर टाकला आहे.

मुंबईत १५ डिसेंबरपासून शाळा सुरू

राज्य सरकारने १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई महानगर पालिकेने १ डिसेंबरपासून शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पालिकेच्या हद्दीतील शाळा आता १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.

पुण्यात पालक संघटनांशी चर्चा करूनच निर्णय घेणार

मुंबई महानगर पालिकेप्रमाणेच पुणे महानगर पालिकेने देखील १ डिसेंबरपासून शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. “यासंदर्भात सविस्तर विचार करून निर्णय घ्यावा लागेल. याबाबत महापालिका क्षेत्रातील पालक संघटनांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ”, असं पुणे महानगर पालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

नाशिकमध्ये १० तारखेपर्यंत निर्णय स्थगित

मुंबई-पुण्यापाठोपाठ नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीतील शाळा देखील १ डिसेंबरला सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ओमायक्रॉनचा नवा विषाणू सापडला असून त्याचा शहरात काही परिणाम आहे किंवा नाही, हे पाहूनच याबाबतचा निर्णय घेता येईल. त्यामुळे १० डिसेंबरपर्यंत यासंदर्भातला निर्णय स्थगित करण्यात आल्याचे नाशिक महानगर पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment