Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

वरळीत सिलिंडर स्फोटात एकाच कुटुंबातील चारजण जखमी

मुंबई (प्रतिनिधी) : वरळी बीडीडी चाळ क्रमांक ३ मधील घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी घडली. यात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले असून त्यात चार महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. वरळीतील गणपतराव जाधव मार्गावरील बीडीडी चाळ क्रमांक ३ च्या पहिल्या मजल्यावर मंगळवारी सकाळी सात वाजल्याच्या सुमारास गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण चाळ हादरली. स्फोटाच्या आावाजामुळे परिसरातील स्थानिकांमध्येही भीती निर्माण झाली. अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु केले. स्फोटामुळे घराला आग लागली. या आगीत घरातील आनंद पुरी (२७), मंगेश पुरी (४ महिने) व विष्णू पुरी (५) विद्या पुरी (२५) हे जखमी झाले असून त्यातील आनंद पुरी (२७) व चार महिन्यांच्या मंगेश पुरी या बाळाची स्थिती गंभीर असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. गॅस गळतीमुळे ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस व अग्निशमन दलाकडून केला जात आहे.

‘हीच का पालिकेच्या रुग्णालयातील तत्पर सेवा?’

दरम्यान या दुर्घटनेतील जखमींना मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जखमींना रुग्णालयात वेळीच उपचार मिळाले नसल्याने त्यांना विव्हळत राहावे लागले. रुग्णालयातील हा व्हीडियो शेअर करत आमदार नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली. नितेश राणे यांनी म्हटले आहे की, हीच का महापालिकेच्या रुग्णालयातील ‘तत्पर सेवा’? नायर रुग्णालयातील हा असंवदेनशील व लाजिरवाणा प्रकार आहे. ही दृश्ये पेंग्वीनप्रेमी पर्यटन मंत्र्यांच्या मतदार संघातील दवाखान्यातील आहेत.

सिलिंडरच्या स्फोटात वरळीतील पुरी कुटुंब अक्षरश: होरपळून निघाले. असह्य वेदनेच्या आक्रांताने तान्हं बाळ विव्हळत आहे. हे दृश्य पाहून कुणाच्याही काळजाचे पाणी होईल. पण डॉक्टर्स मात्र लक्ष द्यायला तयार नाहीत. आम्ही मुंबईकरांना मोफत उपचार देतो, अशी शेखी मिरवणाऱ्या सत्ताधारी सेनेने रुग्णालयांकडे दुर्लक्ष केले. या व्हीडियोवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Comments
Add Comment