नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन शांततेत चालण्यासाठी पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांना अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आवाहन केले. अधिवेशन सुरू होण्याआधी मोदींनी संसदेच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. संसदेचे हिवाळी अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मोदी म्हणाले.
‘देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्यामुळे संसदेचे हे अधिवेशन आणि येत्या अधिवेशनात देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या भावनेनुसार देशाच्या प्रगतीसाठी चर्चा व्हावी, अशी देशातील प्रत्येक नागरिकाची इच्छा अाहे’, असे ते म्हणाले. अशा स्थितीत हे सत्र दूरगामी परिणामांसह विचारांचे, सकारात्मक निर्णय घेणारे ठरते. संसद कशी चालवली गेली आणि किती चांगली चालवली गेली… हे भविष्यात लक्षात ठेवले जाईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
सरकार प्रत्येक मुद्द्यावर खुल्या चर्चेसाठी तयार आहे. प्रत्येक प्रश्नोत्तरे व्हावीत आणि संसद शांततेत चालावी, सरकारच्या धोरणांविरुद्ध विरोधक आक्रमक होऊ शकतात. पण यावेळी त्यांनी संसदेची आणि सभापतींची प्रतिष्ठा राखावी. सर्वांनी संसदेत योग्य वर्तन करावे, ज्यामुळे देशातील पुढील तरुण पिढ्यांना ते कामी येईल, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.