मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात बुधवार १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक सोमवारी जारी करण्यात आले आहे.
यामध्ये, विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या वर्गात १५ ते २० विद्यार्थी एका वर्गात बसतील. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रात शाळा भरावी.
एका वर्गात दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर असणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे, एक बॅच पहिल्या दिवशी तर दुसरी बॅच दुसऱ्या दिवशी किंवा सकाळ दुपार सत्रामध्ये विभागणी करावी. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल.