Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीदक्षिण आफ्रिकेतून मुंबईतही आले १००० प्रवासी

दक्षिण आफ्रिकेतून मुंबईतही आले १००० प्रवासी

आदित्य ठाकरेंची धक्कादायक माहिती

मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनने दहशतीचे वातावरण निर्माण केले असताना दक्षिण आफ्रिकेतून गेल्या १९ दिवसांत तब्बल एक हजाराच्या आसपास प्रवासी मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमिक्रॉन वेगाने फैलावत असल्याने संपूर्ण जगाला चिंता सतावत आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत. केंद्र सरकारसोबत राज्य सरकारने तेथून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध आणले असताना आता आदित्य ठाकरेंनी दिलेल्या माहितीने चिंता अधिकच वाढली आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून एक हजाराच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. आतापर्यंत जे लोक आलेत त्यांची माहिती आपण मिळवली आहे. जे मुंबईत आहेत त्यांना पालिकेकडून फोन केले जात आहेत. यासोबतच परदेशातून आलेल्या गेल्या १० दिवसांतील सर्वांना संपर्क साधून विचारपूस केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था केली जात असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत राहावी, जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल, असे सांगितले.

ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे तेथील लाट सर्वात मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांमध्ये दर दिवशी ३० हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमिक्रॉन विषाणुचे ५० पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढळणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे. केंद्र सरकारने १२ देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी ७२ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून येथे उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसेच १४ दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे.

परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमानसेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न असून पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत करण्यात यावे यावर बैठकीत चर्चा झाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -