नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोना विषाणूचा घातक असा ओमिक्रोन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं असून कोरोनाचा हा नवा विषाणूचा काही देशांमध्ये पसरला आहे. कोरोनावरील लस घेतलेल्यांमध्ये तयार झालेल्या प्रतिकारशक्तीवर सुद्धा हा ओमिक्रोन व्हेरिएंट मात करत असल्याचं समोर आल्यानं जगभरात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरलं आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बैठक घेत देशातील कोरोना विषय उपाययोजनांचा आढावा घेतला. दोन तास चाललेल्या बैठकीत ओमिक्रॉन या नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटबाबतची सद्य स्थिती पंतप्रधानांनी माहिती करुन घेतली.
दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. तेव्हा सध्या तरी अशी कोणतीही बंदी घातली गेली नसल्याचं बैठकीनंतर स्पष्ट झालं आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा ही गेले काही महिने विविध निर्बंधांसह सुरु होती, मात्र आता येत्या १५ डिसेंबरपासून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे ही पुर्ववत सुरु करण्याचा निर्णय हा नुकताच घेण्यात आला आहे. तेव्हा सध्याची कोरोनाची बदलती स्थिती लक्षात घेता आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत असलेल्या निर्बंधांचा आढावा घेण्याचे निर्देश पंतप्रधान यांनी यावेळी दिले.
धोकादायक आहे ओमिक्रॉन
कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉन हा नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो, असे म्हणत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. ओमिक्रॉन हा अत्यंत वेगाने पसरणारा विषाणू आहे. हा विषाणू खूपच धोकादायक आहे आणि पूर्णपणे लसीकरण झालेल्या आणि बूस्टर डोस घेतलेल्या नागरिकांनाही याचा संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. इस्रायलमध्ये नव्या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीने कोरोना लसीच्या दोन्ही डोससह तिसरा बूस्टर डोस देण्यात आला होता. कोरोनाचा हा नवीन विषाणू डेल्टासह इतर कोणत्याही प्रकारांपेक्षा अतिशय वेगाने पसरतो, असे शास्त्रज्ञांच्या तपासातून समोर आले आहे.