मुंबई : कोरोनाचा नवा ओमिक्रोन स्ट्रेन आढळल्याने चिंता वाढली असून केंद्र सरकारने काही तातडीचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कोविड नियम पुन्हा कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा नवा ओमिक्रॉन स्ट्रेन आढळल्यानंतर दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना आणि हाँगकाँग येथून येणाऱ्या प्रवाशांच्या काटेकोर तपासणीचे निर्देश केंद्र सरकारने दिले असतानाच महाराष्ट्र सरकारनेही आज मोठे पाऊल उचलत कोविड नियम अधिक कडक केले आहेत. राज्य सरकारने आज प्रवास व अन्य बाबींसाठी नवी नियमावली जारी केली आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला होता. राज्य दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच कोविडच्या नव्या स्ट्रेनचा धोका निर्माण झाला असून ही बाब लक्षात घेत राज्य सरकार सतर्क झालं आहे. त्यानुसार काही महत्त्वाचे निर्णय घेत नियमावली निश्चित करण्यात आली आहे. विदेशातून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना आता केंद्र सरकारचे निर्देश लागू राहणार आहेत. तर राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोविडवरील लसचे दोन्ही डोस म्हणजेच संपूर्ण लसीकरण आवश्यक असेल. तसे नसल्यास संबधित प्रवाशाला ७२ तासांपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवावा लागणार आहे.
संपूर्ण लसीकरण झाले असलेल्या नागरिकांनाच सवलती देण्याचे धोरण पुन्हा एकदा राज्य सरकारने अवलंबले आहे. त्यानुसार आता कार्यालये, दुकाने, मॉल तसेच कोणत्याही समारंभात सहभागी व्हायचे असल्यास संपूर्ण लसीकरणाची अट घालण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक सेवांमध्येही आता संपूर्ण लसीकरण झाले असेल तरच प्रवेश हे सूत्र ठरवण्यात आले आहे. राज्य सरकारने दिलेला युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास किंवा कोविन प्रमाणपत्र (वैध ओळखपत्रासह) पुरावा म्हणून दाखवावा लागेल. १८ वर्षांखालील मुलांना शाळेचं ओळखपत्र दाखवून प्रवेश दिला जाईल. जी व्यक्ती वैद्यकीय कारणास्तव लस घेऊ शकली नाही त्याला त्याबाबतची अधिकृत कागदपत्रे दाखवल्यावर प्रवेश मिळू शकेल.
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात सार्वजनिक वाहतूकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबत मॉल, सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून युनिवर्सल पास देण्यात आले आहेत. प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आले आहे.
असे आहेत नवे नियम…
– लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच आता सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली जाहीर केली आहे.
– मुंबईतील लोकलप्रमाणे एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षाने प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी देण्यात आली आहे.
– कोरोनाचे नियम न पाळणार्यांविरुद्ध दंडाची व्याप्ती वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
– रिक्षा, टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने मास्क वापरला नसेल तर प्रवाशाला 500 रुपये आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.
– दुकानात ग्राहकांने मास्क घातला नसेल तर ग्राहकाला 500, तर संबंधित दुकानदाराला 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
– मॉल्समध्ये ग्राहकांने मास्क घातला नसेल तर मॉल्स मालकाला 50 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
– राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी, मात्र नियम पाळले जात नसतील तर आयोजकांवर 50 हजार दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
– वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या 3 ते 7 डिसेंबरदरम्यान होणार्या भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम आणि खुल्या मैदानात 25 टक्के प्रेक्षकांना उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.
– चित्रपटगृह, सभागृह, थीएटर, लग्नाचा हॉल अशा ठिकाणी एकूण क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल तर लॉन्स, मैदाने अशा ठिकाणी लग्न वा इतर समारंभ करायचा असल्यास एकूण क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीचे बंधन असणार आहे.
असेल.
– कोविड नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितावर ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक सेवेतील बसचा चालक अथवा वाहक नियम मोडत असेल तर त्यालाही हा दंड लागू असेल.
– एखाद्या बसमधून प्रवास करणारा प्रवासी नियम पाळत नसेल तर संबंधित वाहनाच्या मालकावर १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित
आतापर्यंत १० हाय रिस्क देशांमधून ५८४ प्रवासी बंगळुरुमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी ९४ प्रवासी हे एकट्या द. आफ्रिकेतून आलेले आहेत
कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने जगभरात खळबळ उडविलेली असताना भारतात दक्षिण आफ्रिकेहून आलेले दोन प्रवासी कोरोना बाधित आढळले आहेत. बंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणीवेळी दोन प्रवासी कोरोनाबाधित सापडले. यामुळे बंगळुरु विमानतळावर, आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली.
बेंगळुरू ग्रामीण उपायुक्त के. श्रीनिवास यांनी शनिवारी सांगितले की, या दोघांना नव्या कोरोना व्हायरसची, ओमीक्रॉनची लागण झालीय की नाही हे तपासणी अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. या रुग्णांचा अहवाल येण्यासाठी ४८ तास लागणार आहेत. दोघांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. जोवर ते नव्या व्हेरिअंटने बाधित आहेत की नाहीत हे समोर येत नाही, तोवर त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्येच ठेवले जाणार आहे, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
श्रीनिवास म्हणाले की, आतापर्यंत १० हाय रिस्क देशांमधून ५८४ प्रवासी बंगळुरुमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी ९४ प्रवासी हे एकट्या द. आफ्रिकेतून आलेले आहेत. विमानतळावरील तपासणीच्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी श्रीनिवास गेले होते.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी दिले रुग्णालयांचे ऑडिट करण्याचे आदेश
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व रुग्णालये आणि कोविड सेंटरचे फायर ऑडिट करा, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. शिंदे यांनी राज्यातील सर्व रुग्णालयांमधील आणि कोविड सेंटर्समधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणाची तपासणी करण्याचे आदेश दिले. तसेच या सर्व व्यवस्था कार्यरत करून त्या सज्ज ठेवण्यात याव्यात, असेही आदेश त्यांनी दिले आहेत. नगरविकास मंत्री शिंदे यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी दृश्यप्रणालीद्वारे हजर होते. तसेच, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचेसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी उपस्थित होते.
घातक व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील होणार
घातक व्हेरियंटचा एकही रुग्ण जर एखाद्या इमारतीत आढळला तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात येणार असून त्यांचे कोणत्याही परिस्थितीत गृह अलगीकरण करण्यात येणार नाही असे सांगून दुर्दैवाने असा रुग्ण आढळून आल्यास त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रांमध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे तसे कोविड उपचार केंद्रांचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन त्याची चाचणी घेण्यात येणार असल्याचे सांग़ितले. व्हेन्टिलेटरची तपासणी करुन ते गरजेनुसार वापरता येईल यादृष्टीने ते सज्ज करुन ठेवण्यात येणार असल्याचेही काकाणी यांनी सांगितले.
या 12 देशांतील प्रवाशांसाठी स्क्रिनिंग अनिवार्य
ज्या १२ देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी स्क्रीनिंग अनिवार्य करण्यात आले आहे त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, इस्रायल, हाँगकाँग, यूके या युरोपातील देशांचा समावेश आहे.
परदेशी प्रवाशांचे संस्थात्मक अलगीकरण; दर दोन दिवसांनी चाचणी करणार
परदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशांचे आता संस्थात्मक अलगीकरण करण्यात येणार आहे. या प्रवाशांची दर दोन दिवसांनी कोविड चाचणी करण्या बरोबर कोविड बाधीत व्यक्ती आढळल्यास जिनोम चाचणीही करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.