ठाणे (वार्ताहर) : ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंग शुक्रवारी ठाणे नगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मामलेदार कचेरीत असणाऱ्या ठाणे नगर पोलीस ठाण्यात परमबीर सिंग आल्यानंतर मामलेदार कचेरीचा दरवाजा लावून घेण्यात आला. परमबीर सिंग यांच्याशिवाय कोणालाही आत सोडण्यात आले नाही.
गेले ७ महिने परमबीर सिंग गायब होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर परमबीर सिंग हजर झाले असून गुरुवारी त्यांनी मुंबईतील चौकशीला हजेरी लावली, तर शुक्रवारी ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाले.
या चौकशीनंतर परमबीर सिंग यांनी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजेरी लावली. परमबीर सिंग न्यायालयात आले असताना न्यायालयाचे दरवाजे लावून घेण्यात आले आणि माध्यमातील मंडळींना बाहेरच रोखून धरण्यात आले. न्यायालयामध्ये इतर कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, विकास दाभाडे अशा २८ जणांनी सोनू जालान आणि केतन तन्ना यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून करोडो रुपयांची खंडणी उकळल्याची तक्रार ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
या प्रकरणातील २८ आरोपींपैकी इतर सर्वांची चौकशी झाली असून परमबीर सिंग चौकशीला हजर राहत नव्हते. परमबीर सिंग गायब असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीसही काढण्यात आली होती.
मुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र तांबे यांनी अदखलपात्र वॉरंट रद्द केला असून १० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर परमबीर सिंग यांना जामीन मंजूर केला आहे.
त्यांना १५ हजारांचा जामीन द्यावा लागणार आहे. याची पूर्तता ३ डिसेंबरपूर्वी करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा जामीन मंजूर करत असल्याचेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.