शुक्रवार, २६ नोव्हेंबर! आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस. लहानपणीचे आठवत नाही, कारण तेव्हा सेलिब्रेशन हा काही प्रकारच नव्हता, पण आम्हा मुलांची लग्न झाल्यावर हे सेलिब्रेशन वगैरे सुरू झाले असावे. त्यानिमित्ताने आईकडे जाणे व्हायचे. धुरुवाडीतील आमचे नेहमीच गजबजलेले घर हास्यविनोदाने दणाणून जायचे. मुलं, नातवंड, सुना, जावई सारे एकत्र यायचे… बाबांना सेलिब्रेशनमध्ये फार स्वारस्य नसले तरी आईला आवडायचे. मग आम्ही ती प्रथा चालूच ठेवली… बाबा गेल्यावरसुद्धा…
बाबा गेल्यावर काही वर्षांत आई विस्मरणाने ग्रासली, पण ‘आज काय आहे?’ अशी आठवण करून दिल्यानंतर आठवून हसायची, हौसेने केक वगैरे कापायची… बाबा गेल्यानंतर अशाच एका २६ नोव्हेंबरला काढलेला हा आई-बाबांचा फोटो!
आई-बाबांचे एकत्र फोटो फार कमी, त्यातही फोटो काढताना आईचा चेहरा गंभीर व्हायचा… तिला फोटोचे फार दडपण असायचे… ऐनवेळेला डोळेच मिटायचे आणि मग माझे फोटोच चांगले येत नाहीत म्हणून कुरकुरायची… पण बाबांच्या या फोटोबरोबर मात्र तिची चांगलीच गट्टी जमली होती, त्याचे तिला दडपण नव्हते.
बाबा गेल्यावर करून घेतलेला हा मोठ्ठा फोटो आमच्यासाठी त्यांच्या नसण्याची आठवण होता… आईसाठी मात्र या फोटोचे वेगळेच नाते तयार झाले. फोटो कधी बैठकीच्या खोलीत असे, तर कधी बेडरूममध्ये. संध्याकाळी देवाला न चुकता ती नमस्कार करत असे. एकदा गेले तर संध्याकाळी देवापाठोपाठ बाबांच्याही फोटोला आता ती नमस्कार करू लागली होती. नंतर नंतर तिच्या हालचाली कमी झाल्या, पण फोटोला नमस्कार करण्याच्या निमित्ताने हाताला धरून का होईना; परंतु बैठकीच्या खोलीपर्यंत तिची फेरी होऊ लागली. आता फोटो तिच्या बिछान्यासमोरच, तिला दिसेल असा लावला होता. अंथरुणात पडल्या पडल्या त्या फोटोशी तिचा संवाद वाढू लागला. आम्ही गेलो की, ‘आम्ही आलोय’ हे त्यांना सांगायची, मग आम्ही मोठ्या-मोठ्या आवाजात फोटोशी बोललो, फोटोला नमस्कार केला, की तिला समाधान वाटायचं.
हळूहळू शब्दही मूक झाले आणि खाणाखुणांवर गाडी येऊन ठेपली, पण काहीतरी हातवारे करत बाबांशी बोलणे चालू असे. माझ्या मनात यायचे, नाहीतरी त्यांचा संवाद हा पूर्वीपासून एकतर्फीच तर होता. तिचे बोलणे त्यांनी कधी ऐकले होते? त्यांच्यात संवाद कमी आणि वादच जास्त होई. बाबा गमतीने सांगायचे, आमच्या पत्रिकेत खडाष्टक योग आहे. आई-बाबांचे भांडण हा आमच्यासाठी एक मनोरंजनाचा विषय झाला होता. विषयही तेच आणि मुद्देही तेच…
बाबा गेले आणि भांडण अर्धेच राहिले… बाबा असते, तर दोघांनी सुखदु:खाच्या गोष्टी किती केल्या असत्या माहीत नाही… पण भांडायलासुद्धा हक्काचे माणूस लागते ना… फोटोच्या रूपात तिला नवा सूर गवसला. आपल्या एकाकी आयुष्यात या फोटोलाच तिने एक जिवंत पात्र केले होते. हे फोटोतले ‘पणशीकर’ जास्त चांगले होते. तिचे सारे ऐकून घ्यायचे, शब्दाला शब्द वाढवायचे नाहीत आणि मुख्य म्हणजे तिच्या सतत समोर असायचे. जरा काही निमित्ताने फोटो बाहेर नेला, तर अस्वस्थ व्हायची. पुन्हा १-२ दिवसांनी तिच्यासमोर आणल्यावर तिने हसून हात हलवला की, समजायचे ‘मोगँबो खूश हुवा’!
कधी कधी तिला भासही व्हायचा खिडकीत कोणीतरी असल्याचा. ‘कोण?’ विचारले तर सांगता यायचे नाही. एकदा वहिनीने बाबांच्या फोटोकडे बोट दाखवून विचारले, हे दिसले का? तर मान डोलावली. याचा अर्थ काय होता कोणास ठाऊक.
दिवसेंदिवस शरीर गलितगात्र झाले. डोळ्यांतला जीवही विझू लागला होता. पूर्वी खाण्याचा, विशेषत: गोड खाण्याचा तरी आनंद वाटायचा, नंतर चवही उरली नाही. पण इतके असूनही कुडी प्राण सोडत नव्हती आणि तिचे हाल आम्हाला बघवत नव्हते… कशात गुंतला होता तिचा जीव?
अचानक एके दिवशी तिला बघायला कोणीतरी आले आणि तिच्या खोलीत शिरल्यावर एकदम म्हणाले. “अहो हे काय? आधी हा फोटो त्यांच्या नजरेसमोरून दूर करा. जीव अडकून पडलाय त्यांचा त्याच्यात.” पटण्यासारखे वाटले त्यांचे बोलणे. म्हणून तिची कॉट दुसऱ्या भिंतीला सरकवली आणि आश्चर्य म्हणजे दोन दिवसांत विझू विझू झालेली प्राणज्योत पूर्ण मालवली.
आई गेली!
शेवटचे कित्येक महिने तिला बोलता येत नव्हते… काही राहिले असेल का, मनातले सांगायचे… शिवेल ना कावळा, अशी धाकधूक वाटत होती… तशी आई अगदी पूर्ण व्यवहारी. छोट्या छोट्या गोष्टीत तिचे मन गुंतलेले. आम्ही गमतीने म्हणायचो देखील, “राक्षसाचे प्राण पोपटात असतात, तसा आईचा प्राण तिच्या पर्समध्ये आहे.” काय बिशाद कोणी तिच्या पर्सला हात लावेल!
पण क्षणार्धात कावळा शिवला आणि खरं तर मला वाईटच वाटलं… आई! आमच्या कोणासाठी क्षणभरही घुटमळली नाहीस का गं…
याची थोडी संगती, ती गेल्यानंतर केलेल्या गरुड पुराणाच्या पाठाच्या वेळी लागली… मृत्यूसमयी आपल्याला न्यायला यमदूत येतात, असे आपण म्हणतो पण प्रत्यक्षात आपल्याच कुटुंबातला जवळचा कोणी जीव आपल्याला न्यायला येतो म्हणे. आपली १३ दिवस सोबत करतो… आपले गुंतलेले मन सोडवायला समजुतीच्या गोष्टी सांगतो…
आईला होणाऱ्या बाबांच्या भासांचा हा तर अर्थ नसेल? बाबाच तिला न्यायला आले असतील का? तिच्या साऱ्या जखमांवर फुंकर घालून ‘चल’ असे म्हणून हात पुढे केला असेल का? नक्कीच! नाहीतर मागे एकदाही वळून न बघता ती गेली नसती…
‘जिंदगी के साथ’ बाबांनी तिला किती साथ दिली माहीत नाही… पण ‘जिंदगी के बाद’ या फोटोच्या रूपात ते सर्वकाळ तिच्याबरोबर राहिले. इतर सर्वांची देणी फिटतीलही पण तिचे देणे अन्यथा कसे फिटले असते? …त्यांनी अर्ध्यावर तिची साथ सोडली नाही, तिला एकटे टाकले नाही, हे मात्र या काही अनुभवांवरून मनोमन पटले.
बाबांनी ‘तोच मी’ या आपल्या आत्मचरित्रामध्ये शेवटी त्यांच्या संसाराबद्दल लिहिलेल्या काही ओळींनी हा आठवणींचा आलेख पूर्ण करते..
‘खरं तर संसार करण्याची माझी सहज प्रवृत्तीच नाही. पण संसार माझ्या पत्नीच्या रोमारोमात भिनला आहे. मी फक्त लग्न केलं, संसार मात्र तिने केला. संसाराची सर्व तारेवरची कसरत न कुरकुरता करणाऱ्या माझ्या पत्नीला मी कधी पसाभर पैसा दिला नाही. नाटकासाठीच दशदिशांनी झिरपणाऱ्या माझ्या झोळीतलं उरल-सुरलं द्रव्य मी तिच्या पदरात टाकलं. ते तिनं जपलं, वाढवलं. याशिवाय आमच्या दोघात मतभेद नाही आणि मतैक्य तर अजिबात नाही! मला व्यवहारज्ञान बिलकुल नाही, हा तिचा दृढ समज दिसामासानं प्रतिपच्चन्द्रलेखेव वाढतोच आहे आणि माझा कलामनस्क कंगालपणा तिला आजन्मात कधी कळणार नाही, ही माझी धारणा मी मोठ्या कौतुकानं कुरवाळत बसलोय आणि तरीही हम एक हैं… आणखी काय पाहिजे? अशी ही आमच्या संसाराची सुबक रंगावली. जमीन सारवली तिनं, ठिपके काढले मी, पुन्हा ते ठिपके जुळवून आकृती तिनं काढली, रंग मुलाबाळांनी भरले आणि हे रंगसौंदर्य पाहायला कायम नातेवाईक आणि मित्रमंडळी लाभली. हे कौतुक असेच अक्षय राहो!’
आई-बाबा, तुम्ही एकत्र रेखलेली ही सुरेख रांगोळी आम्ही जपून ठेवू, असा तुम्हाला शब्द देते.
tnkhot@gmail.com
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…