नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्षानुवर्षे एका कुटुंबाकडून चालवले जाणारे राजकीय पक्ष लोकशाहीसाठी मोठे संकट असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनानिमित्त व्यक्त केले. तसेच ज्या राजकीय पक्षांमध्ये लोकशाहीचे तत्त्व नाही, ते लोकशाहीचे संरक्षण कसे करू शकतील? असा सवालही मोदी यांनी उपस्थित केला.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर संविधान दिवस साजरा करायला हवा होता. जेणेकरून पुढील पिढ्यांना संविधान कसे निर्माण झाले हे कळले असते. मात्र, हा संविधान दिन खूप उशिरा साजरा झाला. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव व्हावे हे ऐकण्यास देश तयार नाही. आजही बाबासाहेबांच्या कामाचे पुण्यस्मरण करण्याची इच्छा न होणे ही काळजीची बाब आहे.
जे पक्ष लोकशाही तत्त्व हरवले ते लोकशाहीचे संरक्षण कसे करू शकतील? जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यांत भारत एका संकटातून जात असल्याचे दिसते. ते संकट म्हणजे घराणेशाही असलेले पक्ष, असे त्यांनी यावेळी व्यक्त केले.
डॉ. आंबेडकरांच्या भाषणाची प्रत मोदींकडून शेअर
भारतीय राज्यघटनेस ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९४८ सालच्या भाषणाची प्रत शेअर केली. ‘२६ जानेवारी १९५० या दिवशी भारत प्रजासत्ताक झाला म्हणून तो ‘प्रजासत्ताक दिन’ हे साऱ्यांनाच माहीत असते; परंतु या प्रजासत्ताकाची रूपरेषा ज्या संविधानाने किंवा राज्यघटनेने ठरवली, ते संविधान आपण भारतीय लोकांनी ‘अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत: प्रत अर्पण’ करण्याचा दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९’ आपल्या ट्वीटमध्ये या भाषणाच्या प्रतीचा फोटो शेअर करत पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.