केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला विश्वास
जयपूर (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मार्च महिन्यात भाजपचे सरकार येणार आहे, असे मोठे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. जयपूर दौऱ्यादरम्यान नारायण राणे यांनी हे विधान केले आहे. मार्चमध्ये महाराष्ट्रात अपेक्षित बदल दिसेल, असेही राणे यावेळी म्हणाले. राणे यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान यावेळी नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे आयुष्य जास्त नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, अशी नवी राजकीय भविष्यवाणी केली. दरम्यान त्यांनी यावेळी एखादे सरकार पाडायचे असेल आणि नवे सरकार स्थापन करायचे असेल, तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात, असेही मत व्यक्त केले.
महाराष्ट्र सरकार भेदभाव करत असल्याच्या आरोपावर बोलताना नारायण राणे म्हणाले, “महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही, त्यामुळे तिथे तसे होते. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल आणि अपेक्षित बदल दिसेल, असेही राणे यांनी सांगितले. दरम्यान दिल्लीत बी. एल. संतोष, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची बैठक झाली.