मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्यात संपावर असलेल्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी शनिवारपर्यंत कामावर येण्याची वेळ मागितली आहे. त्यामुळे या काळात कामावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा परिवहन महामंडळाने दिला आहे. दरम्यान शनिवारी जे कामगार कामावर येतील यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री तसेच एसटी महमंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत दिले.
मुंबई सेंट्रल आगारात एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पगारवाढ झाल्यामुळे कामगारांना चांगली पगारवाढ मिळाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कामगार कामावर येऊ लागले आहेत. या पगारवाढीमुळे अनेक कामगारांच्या ग्रेडमध्ये फरक पडू शकतो, असे या चर्चेत दिसून आले. यावर संप मिटल्यावर चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे ते म्हणाले.
विलीनीकरणाचा मुद्दा सध्या न्यायप्रवीष्ट आहे. तोपर्यंत संप चालू राहणे एसटीला, कर्मचाऱ्यांना तसेच ग्राहकालाही परवडणारे नाही. त्यामुळे शासन अनेक पावले मागे आले आहे.
आता कामगारांनी ताबडतोब कामावर रुजू व्हावे. आज रोजंदारीवरील ५०० कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. कामगार हजर न झाल्यास शासनाला कठोर कारवाईचा बडगा उचलावा लागेल, असेही परब म्हणाले.
शुक्रवारी परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी कृती समितीची बैठक झाली. इंटक आणि कामगार सेना संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही
एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही मूळ वेतनात दिली असल्याने त्यांच्या ग्रेड्समध्ये काही तफावत निर्माण होऊ शकतात, अशा प्रकारच्या काही बाबींचा उल्लेख त्यांनी केला. संप जेव्हा संपेल तेव्हा यावर चर्चा करू, कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही. कनिष्ठ कामगार वरिष्ठ कामगारांच्या वर जाणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले. एवढी वाढ दिल्यानंतरही संपाच्या बाबतीत जो काही संभ्रम आहे, त्याबद्दलही यावेळी चर्चा करण्यात आली.
बैठकीत काय चर्चा झाली?
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली. बरेचसे कामगार कामावर रुजू झाले आहेत, एसटी कर्मचाऱ्यांच्या युनियनची कृती समितीशी चर्चा करून याबाबतीत कामगारांचे म्हणणे, किंवा कामगारांची मानसिकता जी गेल्या काही दिवसांत बघितली होती, त्यावर आणि एसटीची सेवा सुरुळीत करण्यासाठी काय उपाय योजले पाहिजेत, याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली.
एसटी कामगार संपावर ठाम
राज्य सरकारने पगारवाढीचा पर्याय दिल्यानंतर एसटी कामगार संपावर ठाम आहेत. एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या १८ दिवसांपासून संप सुरू आहे.