कानपूर (वृत्तसंस्था) : पदार्पणवीर श्रेयस अय्यरच्या लक्षवेधी शतकानंतरही भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी अवघ्या ३४५ धावांवर आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या दिवसावर वर्चस्व गाजवत विकेटसाठी भारतीय गोलंदाजांच्या नाकात दम आणला. दुसऱ्या दिवसाअखेरपर्यंत भारतीय गोलंदाजांना किवींच्या एकाही फलंदाजाला बाद करण्यात यश आले नाही. टॉम लॅथम आणि विल यंग यांनी शानदार नाबाद अर्धशतके झळकावत किवींच्या धावफलकावर बिनबाद १२९ धावा झळकावल्या.
भारताचा डाव ३४५ धावांवर आटोपल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी कमालीचा संयमीपणा दाखवला. टॉम लॅथम आणि विल यंग यांनी शानदार नाबाद अर्धशतके झळकावली. टॉम लॅथमने नाबाद ५० धावा केल्या. पण त्या ५० धावा जमवण्यासाठी त्याने १६५ चेंडूंचा सामना केला. त्यात ४ चौकार लगावले. तर दुसरा सलामीवीर विल यंगनेही कमालीची फलंदाजी केली. त्याने नाबाद ७५ धावा केल्या. त्यासाठी तो १८० चेंडू खेळला. त्यात १२ चौकारांचा समावेश आहे.
दरम्यान भारताकडून इशांत शर्मा, उमेश यादव, रविचंद्रन अश्वीन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या ५ गोलंदाजांनी गोलंदाजी केली. दिवसाअखेरपर्यंत भारताला एकही बळी मिळवता आला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारताचे हे पाचही प्रमुख गोलंदाज अपयशी ठरल्याचे दिसले.
तत्पूर्वी श्रेयस अय्यर वगळता २५८ धावांवरून पुढे फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या दिवशी फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. अय्यरने पदार्पणातच शतकी खेळी साकारत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यामुळे भारत मोठी धावसंख्या उभारेल अशी आशा होती. पण दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच अर्धशतक झळकावलेला रवींद्र जडेजा माघारी परतला. त्यानंतर वृद्धिमान साहा, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल हे फलंदाज एकामागोमाग एक बाद झाले. अश्वीनने ३८ धावा केल्या, तर तळातील अन्य एकाही फलंदाजाला फारशा धावा करता आल्या नाहीत.
किवींच्या सलामीवीरांची शतकी भागीदारी
न्यूझीलंडच्या टॉम लॅथम आणि विल यंग या सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली. विल यंगने १८० चेंडूंत नाबाद ७५ धावांची लक्षवेधी कामगिरी केली, तर त्याचा सहकारी टॉम लॅथमने १६५ चेंडूंत नाबाद ५० धावा केल्या. न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांनी संयमी फलंदाजी केली. त्यामुळे दुसऱ्या दिवसावर किवींच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवल्याचे दिसले. न्यूझीलंडच्या सलामीवीरांच्या संयमीपणासमोर भारतीय गोलंदाज अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले.
तळातील ४ फलंदाजांकडून अवघ्या १४ धावा
श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, शुबमन गिल या प्रमुख फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी तळातील फलंदाजांना छाप पाडता आली नाही. तळातील ४ फलंदाज अवघ्या १४ धावाच करू शकले. यष्टीरक्षक वृद्धिमान साहा, अक्षर पटेल, उमेश यादव आणि इशांत शर्मा या फलंदाजांना मिळून अवघ्या १४ धावाच करता आल्या. जर या फलंदाजांनी एकूण ६० धावा जरी केल्या असत्या तरी भारताला ४०० धावांचा टप्पा ओलांडता आला असता.
भारताचे गोलंदाज अपयशी
दुसऱ्या दिवसात किवींच्या गोलंदाजांनी भारताचे ६ फलंदाज बाद केल्याने भारतीय गोलंदाजांकडून मोठी अपेक्षा होती. पण इशांत शर्मा, उमेश यादव, रविचंद्रन अश्वीन, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा या पाचही गोलंदाजांना बळी मिळवण्यात अपयश आले. भारताच्या या पाच गोलंदाजांनी मिळून ५७ षटके फेकली. पण पाचपैकी एकाही गोलंदाजाला एकही फलंदाजाला बाद करता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडच्या फलंदाजांचे वर्चस्व पहायला मिळाले.