अरुण बेतकेकर
(माजी सरचिटणीस, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना)
एक मजेदार घटना… शिवसेनेचा बालेकिल्ला परळ येथे खासदार मोहन रावले यांच्याद्वारे क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले वा करविण्यात आले होते. अर्थातच, उद्घाटक होते उद्धवजी. जंगी प्रसिद्धी करण्यात आली. जिकडे तिकडे होर्डिंग्ज, आदित्यजींचे बॅटिंग-बॉलिंग करतानाचे मोठं-मोठी छायाचित्रं. वातावरण असे की, ठाकरे कुटुंबाद्वारे देशास-महाराष्ट्रास एक अष्टपैलू क्रिकेटपटू गवसणार. वाजत-गाजत उद्घाटन झाले. त्यानंतर वयाची पासष्ठी ओलांडलेले मोहन रावले बॅट खांद्यावर घेऊन अवतरले, तर उभरते अष्टपैलू १८-२० वर्षांचे तरणेबांड आदित्य ठाकरे बॉल उडवत. मोहन रावले यांनी स्टॅण्ड घेतला. समोर आदित्यजी आपल्या लांबलचक स्टार्टसाठी पावले मोजत पन्नास एक फूट लांब पोहोचले. तुफान गर्दी, गाजावाजा, घोषणाबाजी, सर्वांची उत्कंठा शिगेला अन् आदित्यजींनी स्टार्ट घेतला, बॉल हातातून सुटला आणि रावले यांनी पहिलाच बॉल सीमापार षटकार लगावला. येथेच देशाने-महाराष्ट्राने एक अष्टपैलू क्रिकेटपटू उदयास येण्यापूर्वीच अस्ताला गेलेला पहिला आणि योगायोगाने मोहन रावले यांच्या राजकीय कारकिर्दीचा अंत झाला. एका षटकाराने ही करामत करून दाखविली.
त्यानंतर आदित्यजींच्यातील नवे कलापैलू गवसले. काही वर्षांतच आदित्यजी कवी म्हणून अवतरले. पुन्हा बंदिस्त, चार भिंतीतील खेळ. त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्धीचा सोहळा निश्चित झाला. मुंबईतील सर्व उच्चभ्रू मंडळींना निमंत्रण. शिवसैनिकांना मात्र ठेंगा. शिवसैनिकांची लायकी ती काय, की ते अशा भव्य-दिव्य सोहळ्यास उपस्थित राहतील? शतकातील सर्वश्रेष्ठ अभिनेते, जे आपल्या श्रेष्ठ कवी वडिलांचे काव्यवाचन करताना आढळतात, अशा अमिताभ बच्चन यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे आणि सीडीचे उद्घाटन अन् त्यानंतर त्यांच्याच भक्कम आवाजात कवितांचे वाचन. काव्यसंग्रहाचे वितरण सर्व धनाढ्यांमध्ये झाले. त्यावर आदित्यजींचा एक बेफाम डोळे दिपवणारा फोटो होता. पुढे त्याचे काय झाले, हे ठाकरे कुटुंबासच ठाऊक, पण पद्धत मात्र उद्धवजींना फोटोग्राफर म्हणून जगासमोर पेश करणारीच. अशा प्रकारे क्रिकेटर नसला तरी काय झाले, ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्रास कलाकार म्हणून श्रेष्ठ कवी बहाल केला. आता कवी मनाचे आदित्यजी सांगत फिरतात, काव्यलेखन ही माझी पहिली आवड आहे, पण राजकारणात वडिलांना मदत करण्यापासून कविता लिहिण्यास वेळच मिळत नाही. महाराष्ट्राचे दुर्दैव आणखी काय…!
दुसरे सुपुत्र, तेजसजींची कला जगासमोर येण्याची वाट महाराष्ट्रातील जनता चातकासारखी पाहत आहे. तत्पूर्वीच, त्यांनी राजकारणात उडी घेत शिवसेनेच्या उत्कर्षाचा विडा उचलून सर्वांना चकित केले आहेच. त्यांच्याही कोवळ्या चरणी ज्येष्ठ-श्रेष्ठांची माथी लागत असल्याने ते आनंदात आहेत. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची कल्पना नाही, ती बेताचीच असावी. पण विदेशातील विद्यापीठात अभ्यास करत असल्याचे कळते. सर्व आलबेल असते, तर विदेशी विद्यापीठ कशासाठी? हा प्रश्न उरतोच. विदेशात सहजी पदव्या बहाल करणारी विद्यापीठे कार्यरत आहेत, हे सर्वश्रुत आहे. धनाढ्यांची प्रगतिशून्य मुलं येथून पदव्या प्राप्त करून स्वतःस फॉरेन रिटर्न म्हणवून घेत असतात. तेजस ठाकरे हे पाल, साप, खेकडा यांच्यावर संशोधन करीत असल्याचे ऐकण्यात आले होते. आता असे कळते की, ते मत्स्यकुळातील प्रजातींचा शोध घेत आहेत. येथेही ते एकटे नाहीत, त्यांच्या दिमतीला तज्ज्ञांची टीम आहेच. संशोधनासाठी काही पायाभूत शैक्षणिक पात्रता लागते, ती यांनी पूर्ण केली आहे किंवा नाही हे देवच जाणे. आता नवनव्या कोणत्या आविष्काराचे प्रदर्शन ते जगासमोर भरवणार, यावर साऱ्या जगाचे लक्ष लागून आहे. पुन्हा बंदिस्त चार भिंतीतील खेळ. तेजसजींच्या रूपाने महाराष्ट्रास कोणता कलाकार पेश होतो, ते पाहण्यासाठी अख्खा महाराष्ट्र विव्हळत आहे.
आता उपजीविकेसाठी आपल्या कलेच्या आधारे जगण्याची वेळ आल्यास अशांचे काय होईल? त्यातही आलिशान जीवन जगण्याची सवय अंगवळणी पडलेल्यांची? शिवसेनेची ज्या गतीने अधोगती होताना पाहायला मिळते, तर असा दिवस दूर नाही. पण शिवसैनिकांना त्याची चिंता नको. ठाकरेंच्या पुढच्या दहा पिढ्यांवर याचा यत्किंचितही परिणाम होणार नाही. नेत्यांचीसुद्धा घराणेशाही झोकात सुरू आहेच.
उदाहरणदाखल एक घटना नमूद करतो. दसरा मेळाव्यासाठी ठाणे, मुलुंड, भांडुप परिसरातून शिवसैनिक मुंबईच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांना कळले की, त्या परिसरात शिवसेनेच्या विरोधात एक आंदोलन करण्यात येत आहे. अतिउत्साही शिवसैनिक मागे वळले, त्यांनी प्रतिकार केला. प्रकरण हातघाईवर आले. त्यातील ७-८ शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली, त्यांच्यावर गंभीर कलम दाखल झाले. पुढील आठवडाभर ते बंदिस्त होते, त्यांचे हाल-हाल झाले. कोणीही ना त्यांची विचारपूस केली, ना त्यांचा जामीन करून, त्यांना बाहेर काढण्यास पुढे आला. हे प्रकरण स्वयं उद्धवजींच्या कानी आले. त्यांनी प्रतिप्रश्न केला, “यांना नको ते शहाणपण कोणी करायला सांगितले होते? हा काही माझा आदेश होता का? आता त्यांनी त्यांचं बघून घ्यावं.” सुस्पष्ट, ‘नरो वा कुंजरोवा’.
शिवसैनिकहो! चिंता स्वतःची करा. कारण येन-केन मार्गाने का होईना, आपल्यासारख्या असंख्य शिवसैनिकांचे उदरनिर्वाहाचे साधन, एकमेव शिवसेना हेच राहिले आहे. अतिउत्साह दाखवण्याऐवजी प्रसंग ओळखून ‘कलटी’ मारण्यासाठी ‘पतली गली’ पकडून उभे राहा. अलीकडे शिवसेनेत ‘पतली गली’वालेच वरचढ होत आलेत. आमच्यासारखे शिवसेनेसाठी केसेस घेणारे विजनवासात गेले.
सध्या शिवसेनेने मराठी माणूस आणि हिंदुत्व त्यागणे म्हणजे कंबरेचे सोडून माथ्यावर मुंडावळे बांधण्यासारखेच आहे. सत्ता भोगण्यासाठी ३६चा आकडा असणाऱ्यांशी शैय्यासोबत करण्याचे परिणाम लवकरच दिसून येतील. मग नशिबी काय? ‘ना घर, ना घाट’. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येत केवळ दोनचा फरक. शिवाय सत्तेविना कासावीस, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांचे हात दगडाखाली दबलेले. त्यांनी आज नाईलाजास्तव ‘मा. मु.’ म्हणून उद्धवजींना स्वीकारले. पुढे या दोघांपैकी कुणीही एक-एकानेही वरचढ झाले, तर आपले भवितव्य काय? आतापासूनच याची तरतूद आपण करून ठेवाच. जहाज बुडायला लागले आहे. शिवसेनेतील हिंदुत्ववाद्यांनी अन्य हिंदुत्ववादी पक्षात उडी मारण्याची वेळ आली आहे अन् ही काळाची गरज आहेच.