Monday, March 24, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणइन्सुली सूत गिरणीच्या जागेवर उद्योग उभारावा

इन्सुली सूत गिरणीच्या जागेवर उद्योग उभारावा

स्थानिक शिष्टमंडळाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवेदन

पाठपुरावा करण्याचे राणे यांचे आश्वासन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील सूत गिरणीची जागा शासनाने ताब्यात घेऊन उद्योग व्यवसायातून रोजगार निर्मिती करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व मिल कामगार यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे केली.

इन्सुलीचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय राणे, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, संघर्ष समिती अध्यक्ष विकास केरकर, न्हानू कानसे, विकास संस्था संचालक आनंद राणे, माजी ग्रा. प. सदस्य महेश धुरी, सखाराम बागवे, उल्हास सावंत यांनी नारायण राणे यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन दिले.

इन्सुली सूत गिरणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी रोजगार मिळेल, या आशेने अत्यंत कवडीमोल दराने आपल्या जमिनी दिल्या. मात्र शेतकऱ्यांचे हे स्वप्न अल्पावधीतच भंगले. तत्कालीन आमदार कल्लापा आवाडे व कंपनीने शासनाकडून मिळणारी सबसिडी लटून गिरणी बंद केली. कर्ज थकित झाल्याने राज्य सहकारी बँकेने लिलाव करून ती जागा धनदाडग्यांच्या घशात घातली, असे त्यांचे म्हणणे आहे.

याबाबत शेतकरी, कामगार आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी वेळोवेळी आंदोलन, उपोषण करून या प्रक्रियेला विरोधही केला. मात्र, ही जागा परप्रांतीयांच्या ताब्यात असून अद्याप या जागेवर कोणताही प्रकल्प उभा राहिलेला नाही. शेतकऱ्यांच्या जमिनीवर आलिशान बंगला किंवा रिसॉर्ट उभे राहात असतील, तर त्याला शेतकरी आणि मिल कामगार कडाडून विरोध करत हा डाव हाणून पाडतील. ज्या उद्देशाने कवडीमोलाने म्हणजे केवळ एक रुपया प्रतिगुंठा दराने जागा दिली. त्यामुळे आज भूमिपूत्र भूमीहिन झाला आणि रोजगारही नाही, अशी त्यांची स्थिती असल्याचे निवेदनात नमूद आहे.

या पार्श्वभूमीवर ही जागा शासनाने ताब्यात घेऊन या जागी स्थानिकांसाठी रोजगार उपलब्ध करून भूमिपूत्रांवर होणारा अन्याय दूर करावा, अशा मागणीचे निवेदन शेतकरी कामगार व स्थानिक ग्रामस्थांच्यावतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे देण्यात आले. यावेळी याकडे आपण जातीने लक्ष घालून पाठपुरावा करू, असे आश्वासन राणे यांनी शिष्टमंडळाला दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -