मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सलग दुसऱ्या वर्षीही नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेचे स्वरूप तसेच त्यांच्या प्रकृतीचा विचार करता हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे कळते. येत्या २९ तारखेला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यात यावर औपचारिकपणे शिक्कामोर्तब केले जाईल. त्याचबरोबर हे अधिवेशन कधी, किती दिवस तसेच कोणत्या तारखांना घ्यायचे हेही यावेळी निश्चित केले जाणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हे अधिवेशन फक्त एकाच आठवड्याचे असणार असून ते २२ ते २९ डिसेंबर या काळात घेण्याचे ठरत आहे.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत झाले होते. ते संपतानाच पुढचे म्हणजेच हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. आता ते नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात आले होते.