ठाकरे कुटुंबातील ‘कला’ म्हणजे चार भिंतींतील खेळ

Share

अरुण बेतकेकर

(माजी सरचिटणीस, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना)

अर्थशास्त्राचा नियम आहे, अशी परिस्थिती निर्माण होत जाते, ज्यामुळे ‘श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात आणि गरीब अधिक गरीब होत जातात.’ राजकारणातही असेच होत जाते. परिस्थिती निर्माण होते, ज्यातून अंतिमत: घराणेशाहीचा उगम होतो. घराणेशाही केवळ उच्च पदस्थापुरती मर्यादित राहत नाही, तर तिचे अनुकरण खालपर्यंत झिरपत जाते. मुळात घराणेशाहीत कर्तृत्वाची गरज नसते, हा एक त्यातील महत्त्वाचा दोष. केवळ सत्ता आपल्याच घराण्यात राहावी यासाठी खटाटोप सुरू असतो. ‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ असे दुष्टचक्र तयार होत जाते आणि नेतृत्व त्यात असे गुरफटत जाते, ज्यातून त्यांची स्वतःची सुटका होणे नाही आणि इतरांना त्यास मज्जाव करणे अशक्य होते.

शिवसेनेत हा गुणधर्म काही अनपेक्षितपणे अधिकच प्रखरतेने मूळ धरत आहे. एक वेळ होती, जेव्हा बाळासाहेब काँग्रेसवर टीका करत असत, त्यातील महत्त्वाचा मुद्दा हा घराणेशाहीच असायचा. जाहीरपणे ते म्हणत, शिवसेनेत मी हयात असेपर्यंत घराणेशाहीला वाव नाही. पण झाले उलटे, यास बाळासाहेबांपेक्षा उद्धवजींची महत्त्वाकांक्षाच अधिक कारणीभूत ठरली. त्यांच्याच घराण्यातील एक प्रमुख पदाचे दावेदार म्हणतात, ‘उद्धव हा आयत्या बिळावरचा नागोबा आहे.’ सुरुवातीला बाळासाहेबांनी उद्धवजींना पुढे आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कधी केला नाही. पण आज उद्धवजी एवढ्यातच आपले पुत्र आदित्य आणि तेजस, एवढेच नव्हे, तर स्वतःच्या मेहुणीचा मुलगा वरुण सरदेसाई यालाही पुढे आणण्याचा आटापिटा करीत आहेत. शिवसेनेतील विश्वासू, खुशमस्करे, चाटू नेते मंडळी, ज्यांची उभी हयात शिवसेनेत गेली, वयाची ७५-८० गाठली ते यांच्या कोवळ्या पायावर माथे टेकण्यास लाइन लावून उभे. यामागील त्यांचा उद्देश, आपल्याप्रमाणेच घराणेशाहीची परंपरा आम्हालाही अखंड प्राप्त व्हावी. या घराणेशाहीने ठाकरे कुटुंबास असे ग्रासले आहे की, जनतेच्या मनातून झपाट्याने होत असलेली शिवसेनेची अधोगतीसुद्धा त्यांच्या निदर्शनात येत नाहीये. अशाने लाचारी वाढीस लागते. बाळासाहेबांचे शेवटचे भाषण जगाने ऐकले-पाहिले, ज्यात ते भरलेल्या, कापऱ्या आवाजात म्हणताना दिसतात, ‘मला साथ दिलीत, आता उद्धवला, आदित्यला सांभाळून घ्या.’ या ढाण्या वाघाची केवढी ही केविलवाणी परिस्थिती. ही भावना त्यांची स्वतःची होती की, त्यांच्याकडून तसे वदवून घेण्याचे नाट्य रचले गेले हे देवच जाणे…!

बाळासाहेबांनंतर ठाकरे कुटुंबास, तर आपले श्रेष्ठत्व टिकविण्यासाठी व सिद्ध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. जगाला सांगण्यासारखी कोणतीही तेजस्वी पार्श्वभूमी नाही. पण हीच परिणामशून्यता इतरांच्या गळी उतरविण्यासाठी ते आकाश-पाताळ एक करीत आहेत. ठाकरे कुटुंबाला कलेची देणगी उपजतच प्राप्त आहे, ठाकरे हे कलाकारांचे घराणे, येथे कलाकार जन्मतात, त्यांच्या रक्तात कला आहे, असे रेटून सांगण्याचा प्रयत्न होतो. हे खरे आहे, स्वतः प्रबोधनकार हे श्रेष्ठ होते. बाळासाहेब हे श्रेष्ठ व्यंगचित्रकार अगदी जागतिक दर्जाचे, कीर्तीचे. शिवाय त्यांनी शून्यातून एक विश्व उभे केले. त्यांचे बंधू श्रीकांतजी हे उत्कृष्ट संगीतकार होते आणि त्यांचे सुपुत्र स्वरराज हे बाळासाहेबांचा आदर्श घेत, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत उत्कृष्ट व्यंगचित्रकार झाले आणि शिवसेनेच्या राजकारणात कार्यरतही झाले. येथेच कलेचे द्वार बंद झाले. दुर्दैवाने बाळासाहेबांच्या रक्तरेषेमध्ये काय घडते आहे?

उद्धवजी हे एक सामान्य क्षमतेचे विद्यार्थी होते आणि असे ते स्वतः अभिमानाने सांगतातही. सुशिक्षितांची टिंगल-टवाळी करणे हा त्यांचा एक आवडता छंद. सुरुवातीला त्यांनी बॅडमिंटन खेळून काही जमते का, यासाठी अतोनात प्रयत्न केला. पारड्यात निराशा पडली. त्यानंतर गळ्यात कॅमेरा टांगला. येथे सर्व काही बंदिस्त चार भिंतीत दडलेले. पैशांची कमतरता नसल्याने लाखो रुपयांचे कॅमेरे, लेन्सेस, उत्कृष्ट फोटोग्राफर्स, तज्ज्ञ यांची त्यांच्या दिमतीत तैनाती. अशात एखादा आंधळासुद्धा यशस्वी फोटोग्राफर होऊ शकेल. गेटवे ऑफ इंडियाजवळ उदरनिर्वाहासाठी फोटोग्राफर पर्यटकांचे फोटो काढत असतातच, ज्यांचे फोटो काढले, त्यांना ते आवडतातही, आयुष्यभर ते फोटो घरात टांगून, पाहत ते आनंदी होत असतात. अशाच प्रकारे काही फोटो उद्धवजींनी काढले आणि इतरांच्या नशिबी नसलेले, जगासमोर आपल्या कलाकारीचे प्रदर्शन भरवले. इतरांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले, त्यांना तज्ज्ञ म्हणून सल्ला देताना दिसले. दिमतीला हेलिकॉप्टर आणि तज्ज्ञ मंडळींसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याची हवाई फोटोग्राफी केली. उत्कृष्ट तज्ज्ञांद्वारे एडिटिंग अन् फाइन ट्युनिंग करून घेतले. मोठा गाजावाजा करत सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीत आलिशान उद्घाटन सोहळा, चार दिवसांचे प्रदर्शन घडविले गेले. पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी. लाइनमध्ये सर्व शिवसैनिक, त्यांच्याशिवाय कोणीच नाहीत, जणू काही शिवसेनेचाच कार्यक्रम. दुसऱ्या दिवशी श्रीमंत अन् सुप्रसिद्धांसाठी निमंत्रण निघाले. दोन्ही दिवशी उद्धवजी जातीने उपस्थित. त्यानंतर स्मशान शांतता आणि उद्धवजी गायब. त्यानंतर त्यांनी जंगलात प्रत्यक्ष जाऊन फोटोग्राफीचा आव आणला. सर्व पूर्वनियोजित, त्यासाठी सरकार, प्रशासन, अधिकाऱ्यांना वेठीस धरले गेले. प्रदर्शन झाले. पदरात मात्र जेमतेम प्रतिसाद. मग संघटनेतील आतल्या गोटातील विश्वासू, खुशमस्करे, भाट कामाला लागले. सर्वत्र उदो-उदो सुरू झाला आणि महाराष्ट्राला ठाकरे कुटुंबातून उद्धवजींच्या रूपाने आणखी एक कलाकार गवसला. फोटोग्राफी कलाकाराच्या रूपात उद्धवजी प्रस्थापित झाले आणि कार्यक्षमतेस, कथित कलाकाराचे ग्रहण लागल्याप्रमाणे कार्यक्षमता झाकोळली गेली.

त्यानंतर त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे शिवसेनेच्या राजकीय पटलावर सरळ नेते म्हणून अवतरले. अगदी वयाच्या विशीतील पूर्वार्धात नावावर करोडो रुपये जमा, करोडोंची संपत्ती, आलिशान वाहने वगैरे-वगैरे. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी काडीचीही गरज भासली नाही. त्यांच्या अवतरण्याने शिवसेनेतील ज्येष्ठ-श्रेष्ठांना मात्र माथा टेकण्यास नवीन कोवळी दोन पावले प्राप्त झाली. एकमेकांवर मात करून त्यांच्या पायावर माथा टेकण्यासाठी त्यांच्यात चढाओढ सुरू झाली. वय झाल्यानं वाकता येत नाही, अशी स्थिती झालेल्या ज्येष्ठांची धडपड पाहून गालातल्या गालात हसून स्वतःची करमणूक करून घ्यायची, पण आपण अद्याप वयात आलेलो नाही, असे करवून घेणे योग्य नाही, त्यास मज्जाव करावा, असे संस्कार नाहीत. पाया पडून घेण्याची शिकवणच दिली गेली असल्यास हे पोर तरी काय करेल. शिवाय, जे पाया पडू शकत नसतील किंवा तशी इच्छा नसेल अशांच्या वर तीक्ष्ण नजर वटारून त्यांच्या निदर्शनास आपला राग आणून देण्याचीही यांना शिकवण. आदित्यजींची शैक्षणिक क्षमता देखील जेमतेमच. पात्रता उच्च असती, तर अन्य उठाठेव करण्याची गरज भासली नसती. त्यांना कलाकार म्हणून सादर करण्यासाठी त्यांच्यातील सुप्त कला बाहेर आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. यांना क्रिकेटचे धडे देण्याचे निश्चित झाले. दिमतीला बारा ते पंधरा पगारी क्रिकेटपटूंची फौज, उत्कृष्ट प्रशिक्षक, तज्ज्ञांचे मार्गदर्शन. सुरुवात बॅटिंगने झाली, प्रगती मात्र शून्य. समीक्षा झाली आणि फास्ट बॉलरचे धडे गिरविण्याचे निश्चित झाले. येथेही प्रगती बेताचीच, तरीही त्यांना प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. यासंबंधित घडलेली एक मजेदार घटना…

…उत्तरार्ध उद्याच्या अंकात

Recent Posts

Fawad Khan : पहलगाम हल्ल्यानंतर सरकारचा अ‍ॅक्शन मोड! फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर घातली बंदी

मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…

17 minutes ago

Pahalgam Terror Attack: खारट फ्राईड राईसने वाचवला ११ जणांचा जीव

जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…

46 minutes ago

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

1 hour ago

Summer Tree : उन्हाळ्यात घरातील बाग किंवा कुंड्यांना असं ठेवा ताजंतवानं!

उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…

1 hour ago

भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक, पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…

1 hour ago

हीच योग्य वेळ, आता भारताने पाकिस्तानच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे ठाम मत

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…

1 hour ago