Friday, January 17, 2025
Homeमहत्वाची बातमीएसटी संप सुरूच

एसटी संप सुरूच

सरकारकडून पगारवाढीचा प्रस्ताव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पगारवाढीच्या प्रस्तावावर रात्रभर चर्चा करून आज एसटी संपाबाबतची आमची भूमिका जाहीर करू, असे या कामगारांचे नेतृत्व करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते सदाभाऊ खोत तसेच गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केल्यामुळे एसटी कामगारांचा संप आजही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्याआधी बुधवारी दिवसभर एसटीच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू होत्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्याचे परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी शासनाकडून काही प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यावर या कामगारांचे नेतृत्व करणारे सदाभाऊ खोत तसेच गोपीचंद पडळकर यांनी कामगारांशी चर्चा केली.

बुधवारी सकाळी ११ वाजता चर्चेची दुसरी फेरी सह्याद्री अतिथीगृहात सुरू झाली. या फेरीमध्ये चर्चा झाल्यानंतर अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर परब रुग्णालयात उपचार घेत असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा कामगारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत चर्चेत सहभागी झाले. त्यानंतर अनिल परब यांनी सामंत, खोत, पडळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या एका पत्रकार परिषदेत सरकारचा पगारवाढीचा प्रस्ताव जाहीर केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर विचार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमली आहे. ही समिती १२ आठवड्यांत आपला अहवाल जाहीर करणार आहे. त्यावर मुख्यमंत्री आपली शिफारस देतील. त्यानंतर हा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाईल. ही समिती जो निर्णय घेईल तो शासनाला मान्य असेल, असे परब यांनी यावेळी सांगितले.

ड्युटीवर हजर राहिल्यास पगार मिळणार

ड्युटीवर हजर होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची हजेरी मांडली जाईल. त्याला त्या दिवसाचा पगार मिळेल. जाचक अटी रद्द केल्या जातील, असेही परब यांनी जाहीर केले. कामगारांनी हा प्रस्ताव मान्य करून तातडीने कामावर हजर व्हावे. जे मुंबईत आहेत त्यांनी परवापर्यंत हजर व्हावे. जे गावी आहेत त्यांनी उद्यापर्यंत हजर व्हावे. बाकीच्यांनी तातडीने हजर होऊन एसटी सेवा पूर्ववत सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे जे कामगार या आवाहनाला प्रतिसाद देणार नाहीत, त्यांच्या विरोधात शासन कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

असा आहे प्रस्ताव

एसटी संपामुळे कामगारांचे तसेच महामंडळाचे नुकसान थांबवण्यासाठी सरकारने पगारवाढीचा प्रस्ताव कामगारांसमोर ठेवला आहे. एक ते दहा वर्षे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याला मूळ वेतनात दरमहा पाच हजार, १० ते २० वर्षे सेवेत असलेल्या कामगाराला मूळ वेतनात दरमहा चार हजार तसेच २० वर्षे व त्याहून अधिक काळ सेवेत असलेल्या कामगाराला मूळ वेतनात दरमहा अडीच हजार रुपयांची पगारवाढ देण्याची घोषणा केली.

कामगार ठाम

शासनाच्या या प्रस्तावावर कामगारांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करत कामगार नेते सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानाकडे प्रस्थान केले. तेथे त्यांनी रात्रभर संपावर असलेल्या कामगारांशी चर्चा करून, आज आपली भूमिका जाहीर करण्याची घोषणा केली. कामगार विलीनीकरणावर ठाम असल्याचेच दिसत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -