Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीराज्यातील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान

राज्यातील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्याच्या विविध ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान, तर २२ डिसेंबर २०२१ मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात बुधवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

राज्यातील एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत संपलेल्या ८१ आणि डिसेंबर २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या १८ तसेच नवनिर्मित ६ अशा एकूण १०५ नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यासाठी १ ते ७ डिसेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. ४ व ५ डिसेंबर २०२१ रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ८ डिसेंबर २०२१ रोजी होईल. मतदान २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असेल. २२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल, असे ते म्हणाले.

राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर कोविड-१९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२० रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -