माझे कोकण : संतोष वायंगणकर
कोकणात तरी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि निम्मा ऑक्टोबर महिना हे पावसाळी हंगामाचे मानले जायचे. दिवाळीत पूर्वी एखाद्यावेळी अवकाळी सर यायची; परंतु असे कधी तरी व्हायचे; परंतु गेल्या काही वर्षांत मात्र ऋतुमान, कालचक्र सगळं बिघडलं आहे. गेल्या काही वर्षांत पाऊस सर्वसाधारणपणे कोणत्याही महिन्यात कोसळतो. बरं हलकी सर येण्याचे दिवसही केव्हाचेच बदलले आहेत. पाऊस हवा असला तरीही तो अवेळी पडायला लागला, तर तो नकोसाच होणार ना! नेमकं अलीकडे तसंच होतंय. अशा या केव्हाही पडणाऱ्या पावसाचे परिणाम सर्वच बाबतीत होत आहेत.
ऑक्टोबर हिटनंतर येणारा नोव्हेंबर महिना हा खरं तर कडाक्याची थंडी असणाराच असतो. नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांमध्ये पडणाऱ्या थंडीवर आंबा, काजू, कोकम, जांभूळ अशी सर्व फळपिकं अवलंबून असतात. नोव्हेंबर महिना संपत आला तरीही पाऊस कोसळतोय. बरं दिवसभरात कोणत्याही वेळी पाऊस पडेल, असेच काहीसे वातावरण असते. अवकाळी पडणारा पाऊस या पूर्वी कोकणाने अनेक वेळा अनुभवला आहे. गेले आठवडाभर जो पाऊस पडतोय त्याला अवकाळी म्हणता येणार नाही. अशा पद्धतीने पाऊस पडतोय. दोन-चार तास पाऊस पडतो आणि ठरवलेल्या सर्वांवर पाणी फिरवून जातो. मालवणीत एक प्रचलित म्हण आहे. ‘ठरवलेला साधात, तर दळीद्र कशाक बाधात’ या म्हणीचा अनुभव सध्या महाराष्ट्रभरातील जनता घेत आहे. भातकापणीच्या दिवसांमध्ये पाऊस पडला आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी या पावसामुळे शेतातून कापणी केलेले भात घरापर्यंतही नेले नाही. इतकी वाईट स्थिती झाली की, शेतात कापणी केलेले जाग्यावरच टाकावे लागले.
या पावसाचे फार मोठे परिणाम आहेत. ते केवळ शेतकऱ्यांपर्यंत मर्यादित नाहीत, तर ते सर्वच स्तरातील जनतेला सोसावे, भोगावे लागणारे आहेत. नोव्हेंबर महिन्यांपासून कोकणात जत्रोत्सव सुरू होतो. गावो-गावच्या ग्रामदेवतांच्या जत्रा होत असतात. या जत्रोत्सवात छोटे-मोठे अनेक व्यावसायिक अवलंबून असतात. त्या व्यावसायावर मोठा परिणाम होत आहे. अगोदरच गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटाने सारेच हैराण झाले आहेत. आजही कोरोनाचे संकट आणि सावट दूर झालेले नाही. कोरोनाच्याच भीतीच्या छायेत सगळा वावर आहे. याच वातावरणात सर्वसामान्य माणूस यातही उभा राहण्याचा प्रयत्न करतोय; परंतु उभा राहण्यापूर्वीच पावसाने तो पुन्हा एकदा मोडून पाडला आहे. पाऊस गेले काही दिवस सतत पडतोय. त्याने फार मोठे नुकसान होतेय.
गेल्या पंधरवड्यात अनेक कार्यक्रम रद्द झाले आहेत. या सर्वांचा परिणाम हा अनेक घटकांवर होत असतो. हा असा कोसळणारा पाऊस केवळ शेतकऱ्यांचेच नुकसान करीत नाही, तर इतर अनेकांवर त्याचा परिणाम होत आहे. निसर्गचक्र कसं फिरतंय, हे ठरवणं फारच अवघड झालेले आहे. या बदलत्या निसर्गचक्रामुळे जे आडाखे बांधून काही काम ठरवलं जात होतं, तेच शेतकऱ्यालाही ठरवणे अवघड बनले आहे. या सर्वांचा परिणाम अखंड कोकणावर होत आहे. कोकण या सर्वांतून सावरणे अवघड आहे. दीपावलीच्या काळातही पर्यटक कोकणात आले; परंतु पाऊस हजेरी लावत असल्याने साहजिकच त्याचा परिणामही झाला होता.
आठवड्याभराने डिसेंबर महिना सुरू होईल. वर्ष अखेरीलाही पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येतील, अशी अपेक्षाही आहे. निसर्गाने निसर्गचक्र बिघडविण्याचा प्रयत्न केला तरीही, आपणाला आपले प्रयत्न सोडून चालणार नाहीत. निसर्गाने उभ्या केलेल्या संकटाला सामोरे जात प्रयत्न करत राहिलेच पाहिजेत. सध्या कोकणात पडणारा पाऊस आंबा, काजू, कोकम, जांभूळ, करवंद या सर्वच फळांच्या उत्पादनावर परिणाम करणारा आहे. या फळांच्या निर्मितीसाठी थंडी गरजेची असते. कडाक्याची थंडी पडली, तर आंबा, काजू मोहरेल, बहरेल तरच बागायतदार शेतकरी आर्थिकदृष्ट्या सावरेल. उभा राहिला, शेतकरी तरला पाहिजे. निसर्गाच्या या चक्रापुढे आपण सारेच हतबल आहोत. ही हतबलता कोकणातील शेतकरी गेली काही वर्षे अनुभवतोय; परंतु त्यातूनही तो उभा राहतोय. या पावसाच्या संकटातूनही तो सावरेल. पुन्हा एकदा नवी उभारी घेऊन उभा राहील; परंतु यावेळी पाऊस मात्र केव्हाही धावून येतो. सगळंच होत्याच नव्हतं करतोय. एका मागून एक संकटांची मालिका सुरूच आहे. संकट कधी थांबणार कुणास ठाऊक; परंतु या संकटातही संघर्ष करीत आपणाला उभं राहायचं आहे.
[email protected]