देशाबरोबरच राज्यात आणि मुंबईतही कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आलेला दिसत आहे. आरोग्य यंत्रणा, शासन, प्रशासन तसेच मुख्यत: नागरिकांची सकारात्मक साथ यामुळे गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ साऱ्यांनाच ‘सळो की पळो’ करून सोडलेल्या कोरोनाला अटकाव करण्यात मोठ्या प्रमाणात यश आलेले दिसत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आल्यानंतर मार्च २०२० नंतर प्रथमच मृतांच्या संख्येतही मोठी घट झाली असून मृत्यूदरातही चांगलीच घट झालेली दिसत आहे. मृतांचे प्रमाण आणखी कमी होण्यासाठी मुंबई-पुण्यासह सातारा, नगर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांमध्ये विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, ही बाब मृत्यू विश्लेषण अहवालातून पुढे आली आहे. या अहवालात १ ते १६ नोव्हेंबर या कालावधीतील मृत्यूंचे विश्लेषण करण्यात आले आहे. गणेशोत्सव, दसरा आणि त्यानंतर सर्वात मोठा सण दिवाळी अशा प्रकारे लागोपाठ येणाऱ्या सणांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती.
सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झालेली गर्दी आणि नियम पालनाबाबतच्या बेफिकिरीमुळे दिवाळीनंतर काेरोना रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त होत होती. त्यासाठी वारंवार सर्वांना सावधगिरीचा इशारा देण्यात येत होता. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीही नेहमीच कोरोनाबाबतच्या नियमांचे, निर्बंधांचे योग्य तऱ्हेने पालन करण्याचे आवाहन करीत होते; परंतु दिवाळीनंतर आता पंधरा दिवसांहून अधिक काळ उलटून गेला तरी कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असलेली दिसत आहे. तसेच मृतांच्या संख्येतही सतत घट होत असल्याचे आढळत आहे. ही एक फारच सकारात्मक गोष्ट आहे. राज्यात ऑगस्टमध्ये सुमारे १ लाख ५८ हजार रुग्णांचे नव्याने निदान केले जात होते. त्यानंतर उत्तरोत्तर हे प्रमाण कमी होताना दिसत असून ऑक्टोबरमध्ये दरदिवशी साधारण ५९ हजार नवे रुग्ण सापडत होते. राज्यात आता
१६ नोव्हेंबपर्यंत सुमारे १५ हजार रुग्ण आढळले आहेत.
कोरोना संसर्गाचा प्रसार गेल्या महिन्यापासून वेगाने कमी होत असून मृतांच्या संख्येतही घट होत आहे. राज्यात ऑगस्टमध्ये २ हजार ९७७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी मृत्यूदर हा १.८७ टक्के होता. ऑगस्टपासून मृतांच्या संख्येत घट झाली असून ऑक्टोबरमध्ये १०५४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. ऑक्टोबरमध्ये मृत्यूदर १.७७ टक्क्यांपर्यंत घटला आहे. नोव्हेंबरमध्ये यात आणखी घट झाली असून १ ते १६ नोव्हेंबर या काळात केवळ २१४ मृत्यू झाले आहेत आणि मृत्यूदर १.४५ टक्के झाला आहे. ऑक्टोबरमध्ये मुंबईत १७२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता १६ नोव्हेंबरपर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दैनंदिन मृतांचे प्रमाणही आता खूप कमी झाले असून गेल्या आठवडाभरात केवळ १३ मृत्यू झाले आहेत. ऑक्टोबरमध्ये मुंबईपाठोपाठ नगर (१६१), सातारा (१३६), पुणे (१२४), सोलापूर (७८), ठाणे (७८) या जिल्ह्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक होते. या जिल्ह्यांमध्येही गेल्या काही दिवसांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झाले असून रुग्णसंख्याही कमी झाली आहे. कोरोना निर्बंधांमध्ये आता मोठ्या प्रमाणात सूट मिळत असताना सर्वचजण विविध सोहळे, समारंभ, स्पर्धा यांना आता मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी विवाह सोहळे, साखरपुडे, वाढदिवस समारंभ आता जोशात साजरे होताना दिसत आहेत. देवदिवाळीनंतर लग्नाचे अनेक मुहूर्त असून विवाह सोहळ्यांना होणारी गर्दी टाळायला हवी. नाही तर आटोक्यात असलेला कोरोना पुन्हा एकदा सर्वांच्या मानगुटीवर बसण्याची भीती दिसत आहे. पर्यटनालाही आता चांगलाच बहर आलेला दिसत आहे. मुंबई जवळची खंडाळा, लोणावळा, माथेरान यांसारखी पर्यटन स्थळे आता पुन्हा एकदा गजबजू लागली आहेत. अनेक लहान-मोठ्या स्थळांवर विशेषत: छोट्या उद्यानांमध्येही लहान, तरुण मंडळींची गर्दी वाढलेली दिसत आहे. सरकारनेही शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा तसेच मंदिरांची दारेही उघडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जसा मंदिरे उघडण्याचा निर्णय जाहीर होताच, आता प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी वाढताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या अंगारक संकष्ट चतुर्थीच्या वेळी ही बाब प्रमुख्याने दिसली. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, टिटवाळा येथील महागणेश मंदिर येथे आदल्या दिवशी रात्रीपासूनच भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावलेल्या दिसल्या. यावेळी काही ठिकाणी कोरोनाबाबतच्या निर्बंधांचे पालन करताना नागरिक दिसले, तर काही ठिकाणी भक्तजनांना कोरोनाचा विसर पडलेला दिसला. आता लोकल गाड्यांमध्ये आणि लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्येही प्रवाशांची गर्दी वाढताना दिसत आहे. आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा, स्वच्छता क्षेत्रांबरोबरच अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी यांना लोकल प्रवासाची संधी प्रथम देण्यात आली होती.
कालांतराने परिस्थितीत सुधारणा झाल्यावर आणि ज्यांचे लसींचे दोन डोस घेऊन झाले असतील, अशा सर्वांना आता लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. ही बाब ध्यानी घेतली तरी राज्यात सध्या १० कोटी ७७ लाख जणांना दोन्ही लसमात्रा देण्यात आल्या आहेत. तरी अजूनही हजारो लोक दुसऱ्या लसीपासून दूर राहिलेले एका अहवालातून उघड झाले आहे. कोरोनापासून मुक्ती हवी असल्यास लसीकरण गरजेचे आहे. त्यामुळे दुसरी लस घेण्यास जे लोक टाळाटाळ करीत आहेत, त्यांचे मन वळवून लसीकरण करण्यास त्यांना भाग पाडले पाहिजे. म्हणजेच कोरोनापासून सर्वांचेच रक्षण शक्य होईल. विशेष म्हणजे परदेशात कोरोनाचे वाढते स्वरूप आणि गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता आपल्याकडे येत्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे लसीकरणावर आपण जसा भर देत आहोत, त्याप्रमाणे कोरोनाबांधितांची आणि मृतांची संख्या कमी झाली तरी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.