कानपूर (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी मालिकेत पाहुण्या न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिल्यानंतर भारत आता कानपूर येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. २०२१ मध्येच इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यानंतर दोन्ही संघ प्रथमच कसोटीत समोरासमोर आहेत. वर्ल्ड कप टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारताकडे आहे. ग्रीनपार्क येथील रेकॉर्ड भारताच्या बाजूने आहे. गेल्या ३८ वर्षांत या मैदानात भारताने एकही कसोटी सामना गमावलेला नाही.
भारताने ग्रीन पार्क स्टेडियमवर आतापर्यंत २२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी ७ सामन्यांत भारताला विजय आणि ३ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे, तर १२ सामने अनिर्णीत राहिले आहेत. या मैदानात १९८३ मध्ये भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर भारतीय संघाने या मैदानात कसोटी सामना गमावलेला नाही. १९८३ मध्ये वेस्टइंडीज विरुद्ध भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर या मैदानात भारताने ८ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी ५ सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला, तर ३ सामने अनिर्णित राहिले आहेत.
ग्रीनपार्कच्या खेळपट्टीवर झालेले शेवटचे तीन सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे या मैदानात सलग चौथा सामना जिंकण्याची संधी भारताकडे आहे. २००८ मध्ये भारताने या मैदानावर दक्षिण आफ्रीकेला ८ विकेटनी पराभूत केले होते. २००९ मध्ये श्रीलंकेला डाव आणि १४४ धावांनी पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर २०१६ मध्ये न्यूझीलंडला याच मैदानावर १९७ धावांनी धूळ चारली होती.
न्यूझीलंडविरुद्ध २०१६ मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात फिरकीपटू गोलंदाज रविचंद्रन अश्विनने चांगली गोलंदाजी केली होती. त्यावेळी एका कसोटी सामन्यात १० फलंदाजांना बाद करण्याची कामगिरी अश्विनने केली होती. अश्विनने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ९३ धावा देत ४ फलंदाजांना माघारी धाडले होते, तर दुसऱ्या डावात १३२ धावा देत ६ फलंदाजांना बाद केले होते. अश्विन गुरुवारपासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेत भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. त्यामुळे पुन्हा अश्विनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.