Saturday, September 21, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यस्वतःबद्दलची भ्रामक कल्पना सोडा

स्वतःबद्दलची भ्रामक कल्पना सोडा

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

या लेखाच्या माध्यमातून, आपले कुटुंब सावरणे, सांभाळणे, हितसंबंध वृद्धिंगत करणे यासाठी कसे प्रयत्न करावेत, यावर ऊहापोह करणार आहोत. आपल्या कुटुंबातील, घरातील जे जे नातेसंबंध दुरावलेले आहेत, मनाने अथवा शरीराने लांब गेलेले आहेत, नोकरी अथवा व्यावसायिक कारणाने अन्य ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत किंवा कौटुंबिक कलह, भांडण यामुळे अबोला धरलेले आहेत, त्या नात्यांना नवसंजीवनी देऊयात. सुरुवात करूयात पती-पत्नीच्या नात्यापासून! संपूर्ण कुटुंबाला तोलून धरणे, सर्व नात्यांना जबाबदारीने सांभाळून सगळ्यांना आपलंस करणे ही ताकद या पती-पत्नीच्या नात्यात आहे. समाजात अशी अनेक जोडपी असतील, ज्यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणास्तव दुरावा आलेला आहे. ते एकमेकांपासून लांब राहत आहेत, काही कारणास्तव त्यांच्यात गैरसमज झालेले आहेत, वादविवाद झालेले आहेत किंवा काही अपरिहार्य कारणामुळे वेगळे होण्याच्या देखील तयारीत आहेत.

गरज आहे ती, तुटत चाललेले; परंतु पूर्णपणे न तुटलेले नातेसंबंध वाचवण्याची… नात्याची विझत चाललेली पणती पुन्हा प्रज्वलित करण्याची… एकमेकांमध्ये असलेले भांडण, क्लेश, गैरसमज संपवून, स्वतःचा इगो बाजूला ठेऊन आपल्याकडून पहिलं पाऊल टाकण्याची… थोडी माघार घेऊन इतरांना मोठेपणा देण्याची… हे ठरवण्याची की, इथून पुढे कुटुंबातील कोणालाही दुखावणार नाही, वाईट बोलणार नाही, कोणाची निंदा करणार नाही… तू तू आणि मी मी करण्यापेक्षा आपलं म्हणून सगळ्यांना स्वीकारण्याची… आम्ही-तुम्ही म्हणून घरात अधिक फूट पडण्यापेक्षा आपण म्हणून एकत्र येण्याची…

स्वतः पुढे व्हा… बायको रागावून माहेरी आहे तिला भेटायला जा; बहीण बोलत नाहीये स्वतः फोन करा; भाऊ माघार घेत नाहीये तुम्ही नमते घ्या; आई-वडील दुरावलेले आहेत, त्यांना जवळ आणा; मित्र-मैत्रिणींना भेटायला जा, शेजाऱ्यांना आपल्या घरी बोलवा, घरातील बालगोपालांना नातं जोडणे शिकवा, तोडणं नाही!

त्यानं असं वागावं, तिने तसं करावं, याने असं बोलावं, त्यांनी इकडे यावं, यांनी तिकडे जावं, तो स्वतःला काय समजतो, ती स्वतःचा स्वाभिमान धरून ठेवते, हा बोलत नाही, तो फोन करत नाही, याला माझी किंमत नाही, ही स्वार्थी, तो मतलबी, याने धोका दिला, त्याने माझा गैरफायदा घेतला, यांनी मला फसवलं आणि त्यानं मला बरबाद केलं… हेच आणि हेच विचार जर आपण अंतर्मनात करत असू आणि स्वतः परिस्थिती सुधारण्यासाठी कोणतेही सकारात्मक पाऊल टाकत नसू, तर कुटुंबव्यवस्था टिकणे, कुटुंबातील सदस्य जवळ येणे अशक्य आहे.

आपल्यातला मीपणा, खोटा अहंकार स्वतःबद्दलची भ्रामक कल्पना सोडून देण्याची आवश्यकता आहे. मोकळ्या मनाने स्वतःच्या चुका स्वीकारा, मान्य करा… चुका कितीही झाकल्या तरी आणि कितीही पांघरूण घातल्या तरी लपत नसतात. त्यामुळे आपल्याच माणसांजवळ चुकांचे खोटे समर्थन करण्यापेक्षा आणि स्वतःच्याच तोकड्या बुद्धी आणि हलक्या विचारसरणीचं हसू करून घेण्यापेक्षा चुका मान्य करा. चांगली-वाईट परिस्थिती स्वीकारून, त्यासाठी कोणालाही दोष न देता, कोणावरही खापर न फोडता, आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून हसत-खेळत जवळ या. कुटुंबातील प्रत्येकाला त्याच्या गुण दोषांसहित स्वीकारणे म्हणजेच कुटुंबाचे नेतृत्व करणे होय. इतरांना बदलण्याच्या भानगडीत न पडता स्वतःला बदला. स्वतःला सगळ्यांना सांभाळून, समजावून घेण्याइतपत सक्षम बनवा.

आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरविते… परंतु आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरविते… पण आयुष्यात कोण टिकून राहणार हे स्वभाव ठरवितो… मित्र-मैत्रिणींच्या बाबतीत हे लागू होऊ शकते; पण नातेसंबंधांमधील लोकांकरिता आपल्याला पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळे जे नातेसंबंध आपल्याशी जन्माला आल्यापासून किंवा लग्नामुळे जोडले गेलेले आहेत, ते चांगल्या पद्धतीने निभावणे क्रमप्राप्त असते. प्रत्येक नातेसंबंध, प्रत्येक व्यक्ती, त्याचा स्वभाव, त्याची वागणूक, विचारधारा यात तफावत असणारच, पण तरी देखील एकमेकांना आपलं समजून, एकमेकांना आधार देऊन कुटुंबरूपी वटवृक्षाचा पाया किती मजबूत करता येईल, याचा आपण प्रयत्न करूयात. कुटुंबातील सदस्य शरीराने कितीही दूर असतील, लांब राहत असतील तरी मनाने त्यांना दूर जाऊ न देणे आपल्या हातात आहे.

कुटुंबातील प्रत्येक सदस्य महत्त्वाचा आहे. जेव्हा नियतीने त्याला तुमच्याशी कोणत्या ना कोणत्या नात्यात गुंफले आहे, तेव्हा तुम्ही त्या नात्याला न्याय देणे लागताच. ज्या व्यक्तींना परमेश्वरानेच तुमच्याशी बांधले आहे, एखादी व्यक्ती जर तुमच्याच कुटुंबाशी बांधली गेली आहे, ती व्यक्ती जर तुमच्या आयुष्याचाच एक भाग आहे, तर त्या व्यक्तीला योग्य तो सन्मान, आदर, योग्य स्थान देण्यात आपल्याला कमीपणा का वाटावा? किंवा कोणतंही नातं टिकविण्यासाठी आपल्याच लोकांपुढे नमतं घेण्यासाठी आपला अहंकार आडवा का यावा, यावर प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -