सावंतवाडी (प्रतिनिधी) : परिवहन मंत्री जरी कोकणचे असले तरीही त्यांना कोकणी माणसाबद्दल आत्मीयता नाही. ते केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘कलेक्टर’ आहेत, अशी टीका केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली.
सावंतवाडी एसटी आगारालगत सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सोमवारी दुपारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट देत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
केंद्राच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी आपण लवकरच पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची ग्वाही त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिली.
राणे यावेळी म्हणाले, एसटी महामंडळ हे महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येते. मात्र गेले पंधरा दिवस आपल्या न्याय मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असूनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत सुमारे ४० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असतानाही राज्य सरकार त्यांना खेळवत आहे.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कोणत्याही बाबतीत कधीही तोडगा काढणार नाहीत. खेळवत ठेवणं हेच त्यांचं काम आहे, असेही यावेळी राणे यांनी म्हटले आहे.