२० डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे कोर्टाचे आदेश
मुंबई (प्रतिनिधी): तब्बल तेरा दिवस आंदोलन सुरू असूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने लक्ष न दिल्याच्या निषेधार्थ एसटी कामगारांनी सोमवारी परिवहन मंत्री अनिल परब आणि महाविकास आघाडी सरकारचे तेरावे घातले.
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात एसटी संपाविरोधातील पुढील सुनावणी २० डिसेंबरला होणार असून पुढील सुनावणीपर्यंत कामगार संघटनांनी चर्चा करून समितीने सकारात्मक तोडगा काढावा, असे आदेश दिले आहेत.
गेले १३ दिवस एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीला घेऊन एसटी कामगार आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. मात्र सरकारने अद्यापही विलीनीकरनाच्या मागणीला घेऊन तोडगा न काढल्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. सरकारशी चर्चेला तयार आहे, मात्र विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत, अशी भूमिका सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली. मागणी मान्य होईपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तर सरकारकडून न्यायालयाने नियुक्ती केलेल्या समितीच्या अहवालानंतर विलीनीकरणाबाबत निर्णय घेता येईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
कामगार विलीनीकरणावर ठाम असून मागणी मान्य होईपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा इशाराही कामगारांनी यावेळी दिला आहे, तर चर्चेतूनच तोडगा निघू शकतो. मात्र, सरकारने ठोस भूमिका घेऊन चर्चेला यावे, पण सरकार तसे करत नाही, याउलट कामगारांशी चर्चेचे नाटक करते. त्यामुळे मागणी मान्य होईपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा इशारा भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना जादा वेतन?
राज्याचे उत्पन्न लक्षात घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कशा प्रकारे वाढवणे शक्य आहे, की त्यामुळे ते आपला गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेतील, या दृष्टीने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.
अजित पवार काही वेळातच निघून गेल्यानंतर शरद पवार आणि अनिल परब यांच्यात बैठक झाली. या बैठकीत एसटी महामंडळाचे अधिकारीही उपस्थित होते. एसटीच्या संपामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे एसटी संपावर शक्य तितक्या लवकर मार्ग काढावा, यावर सारे लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
या बैठकीत एसटी कर्मचारी आणि त्यांचे प्रश्न, त्यांच्या वेतनवाढीचा विषय, इतर राज्यांमध्ये गेले काही दिवस वाहतूक कशी चालते, त्यांचे पगार काय आहेत? या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती अनिल परब यांनी बैठकीनंतर दिली. हा संप लवकरात लवकर संपावा, यात कर्मचारी आणि प्रवासी दोघांचेही नुकसान होत आहे, असेही अनिल परब यांनी सांगितले.