Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडीपालघर

वसईत सहा आदिवासी महिलांना पोलिसांकडून मारहाण

वसईत सहा आदिवासी महिलांना पोलिसांकडून मारहाण

नालासोपारा (वार्ताहर) : वसईत काम मिळवण्यासाठी बाहेरून आलेल्या सहा आदिवासी महिलांना चोर समजून येथील पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलीस उपायुक्तांनी दिले आहेत. पोलिसांनी या सहा आदिवासी महिलांना चोरीच्या केवळ संशयावरून ताब्यात घेतले होते. त्यांना मारहाण केली आणि चूक लक्षात आल्यानंतर त्यांना सोडून दिले. एवढेच नाही तर त्यांना ताब्यात घेतल्याची कोणतीही नोंद पोलीस दफ्तरी करण्यात आलेली नाही, असा आरोप आदिवासी संघटनेकडून केला जात आहे.

वसईत आदिवासींच्या अनेक समस्या असताना व कोणतीही चूक नसतानाही त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. डहाणू येथील कासा परिसरात राहणाऱ्या बेबी नारायण वावरे, दीपिका दिनेश वावरे, विमल माणक्या पुंजारा, सोनम सबू भोईर, सीता संताराम भोईर, तारू सुभाष डोकफोडे या सहा आदिवासी महिलांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या महिला वसईच्या पापडी तलाव, कोळीवाडा या ठिकाणी राहतात आणि मोलमजुरीचे काम करतात. या महिला शुक्रवारी पापडी येथे बाजारात गेल्या होत्या. तेथे सामान विकत घेत असताना काही नागरिकांनी त्या चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना दिली. तर पोलिसांनी या महिलांना पापडी येथील पोलीस चौकीत नेले. तेथील सहायक पोलीस निरीक्षक वाघ आणि अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना लाठीने मारहाण करून पुन्हा बाजारात दिसू नका, अशी धमकी दिली. तर या महिलांनी घटनेची माहिती आदिवासी संघटनांना दिली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारला असता केवळ समज देण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना मारहाण केली नसल्याचा दावा केला. दरम्यान, वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय तपासणीत महिलांच्या दंडावर मारहाणीच्या खुणा आढळल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले. हा संपूर्ण प्रकार निंदनीय आहे. तसेच पोलिसांनी इतक्या बेदमपणे महिलांना मारहाण केल्याने संबंधित पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी २५ नोव्हेंबरला वसई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आदिवासी कार्यकर्त्यांनी केला आहे.

Comments
Add Comment