Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीसातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, शशिकांत शिंदे पराभूत

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, शशिकांत शिंदे पराभूत

अजित पवारांचा दौराही रद्द

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांचे धक्कादायक निकाल हाती आले असून यामध्ये दिग्गजांसह महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसला आहे. पाटण तालुक्यातून गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचा पराभव झाला असून सत्यजित पाटणकर हे विजयी झाले आहेत. जावली तालुक्यातून राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा केवळ एका मताने पराभव झाला आहे, तर ज्ञानदेव रांजणे हे विजयी झाले आहेत. रांजणे हे राष्ट्रवादी पक्षातील बंडखोर उमेदवार आहेत. त्यांचा विजय झाल्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे कार्यालय फोडल्याने साताऱ्यात खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एका मताने पराभव झाल्यानंतर शिंदे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. आमदार शिंदे यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील ज्ञानदेव रांजणे हे एका मताने विजयी झाले आहेत. या निकालाच्या निमित्ताने साताऱ्यात राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याची चित्रं स्पष्ट दिसत आहेत. त्यातच अजित पवारांचा सातारा दौरा सुद्धा रद्द झाला आहे. त्यामुळे शशिकांत शिंदेंचा पराभव हा दौरा रद्द व्हायला कारण तर नाही ना, अशी चर्चाही साताऱ्यात रंगली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे विजयी झाल्यानंतर त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्यासारखा बलाढ्य नेता एवढा छोटा पराभव सुद्धा पचवू शकला नाही, असे ते म्हणाले. शशिकांत शिंदेंना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा देखील रांजणे यांनी दिला आहे.

कोरेगाव तालुक्यातून सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक यांना समान मत पडल्यामुळे या ठिकाणी टाय झाल्याचे पाहायला मिळाले, तर कराडमधून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव झाला आहे. खटाव तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गेही विजयी झाले असून नंदकुमार मोरे यांचा पराभव झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -