Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीएसटी कामगारांना हंगामी पगारवाढीचा शासनाचा प्रस्ताव

एसटी कामगारांना हंगामी पगारवाढीचा शासनाचा प्रस्ताव

उद्या सकाळी पुन्हा होणार बैठक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्याच्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अंतरीम पगारवाढ देऊन त्यांचा संप मिटविण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून मंगळवारी करण्यात आला. त्यानंतर आता बुधवारी सकाळी ११ वाजता कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी सरकार पुन्हा एकदा चर्चा करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपावरील कामगारांचा संप मिटविण्याच्या दृष्टीने राज्याचे परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी विविध कामगार नेते तसेच आझाद मैदानावर कामगारांचे नेतृत्व करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्याबरोबर सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली. या बैठकीत न्यायालयाच्या आदेशाचा सरकार आदर करत आहे. कामगारांनीही तो करावा, असे आवाहन करत त्यांनी या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर नेमण्यात आलेली समिती जो निर्णय देईल, तोपर्यंत थांबण्याचे आवाहन केले.

‘जोपर्यंत समितीचा निर्णय येत नाही तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना हंगामी पगारवाढ दिली जाईल आणि संपकरी कामगारांनी संप मागे घेऊन एसटी सेवा पूर्ववत सुरू करावी, असा प्रस्ताव परब यांनी मांडला. त्यावर कामगारांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका कामगारांच्या प्रतिनिधींनी घेतली. त्यानंतर बुधवारी सकाळी ११ वाजता पुन्हा चर्चा करण्याचे निश्चित झाले.

‘आम्ही या समितीला जी काही माहिती हवी आहे, ती देतो आहोत. सर्व संघटनांना उच्च न्यायालयाने म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. या प्रक्रियेला बराच कालावधी लागणार आहे. तोपर्यंत दुसरा काही पर्याय असेल तर आपण द्यावा, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. यात अंतरीम वाढ देणे किंवा निकाल येईपर्यंत इतर काही चर्चा करायची असेल तर तुम्ही त्याचे पर्याय द्यावेत. याबाबत कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. समितीचा जो अहवाल येईल, तो राज्य शासन मान्य करेल हे आम्ही ठरवले आहे. पण तोपर्यंत हा संप असाच चालू राहू शकत नाही. याबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा सकारात्मक झाली आहे’,असे ते म्हणाले.

परबांच्या घरावर फेकली शाई; चौघांना घेतले ताब्यात

दरम्यान, महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप आज १४ व्या दिवशीही सुरूच आहे. पण आता तो अधिक चिघळला असल्याचे चित्र दिसत आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानावर मंगळवारी काळी शाई फेकण्यात आली. या प्रकरणी जनशक्ती संघटनेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कामगारांचा संप सुरूच आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे मात्र हाल होत आहेत. एसटी महामंडळाचे विलिनीकरण राज्यशासनामध्ये करण्यात यावे अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र, सरकार ही मागणी मान्य करायला तयार नाही. विलिनीकरणाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी एक समितीही नेमण्यात आली आहे. मात्र तरी आंदोलनकर्ते कर्मचारी संपावर ठाम आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबनही करण्यात आले आहे. तरीही एसटी कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत.

नागरिकांकडून संताप

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा त्रास केवळ ग्रामीण भागातील जनतेलाच नव्हे, तर मुंबईच्या गांधीनगर-खेरवाडी परिसरातील लोकांनाही सहन करावा लागत आहे. येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून म्हाडा ते चेतना कॉलेज या रस्त्यावरील बेस्ट बसवाहतूक बॅरिकेट्स उभारून पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना मधेच रस्त्यात उतरावे लागते किंवा पूर्ण वळसा घालून मागे यावे लागते. परिणामी लोकांमध्ये याबद्दल रोष व्यक्त करण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -