Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीमाथेरान पशुवैद्यकीय दवाखान्याकडे जिल्हाप्रशासनाचे दुर्लक्ष

माथेरान पशुवैद्यकीय दवाखान्याकडे जिल्हाप्रशासनाचे दुर्लक्ष

माथेरान (वार्ताहर) : माथेरान अतिदुर्गम भागात मोडणारे महाराष्ट्रातील एक छोटे पर्यटनस्थळ आहे. येथे सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असल्याने त्याचे महत्त्व वाढते. वाहन नसल्याने वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी मर्यादा येत असतात. त्यामुळे येथे उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा असणे गरजेचे आहे. येथे वाहन म्हणून घोड्यांचा वापर होत असल्याने येथील पशुवैद्यकीय दवाखाना सुस्थितीत असणे गरजेचे आहे; परंतु जिल्हाप्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या दवाखान्याची दुरवस्था झाली असून तातडीने त्याच्या दुरुस्तीची मागणी स्थानिकांनी केली आहे.

माथेरानमध्ये पर्यटकांना वाहन म्हणून घोडा व हातरिक्षा उपलब्ध आहेत; परंतु बहुतेकजण घोड्यांचाच वापर अधिक प्रमाणात करतात. येथे प्रवासी अश्वांची संख्या ४६०, तर मालवाहतूक घोड्यांची संख्या ३००हून अधिक आहे. माथेरानमधील रस्ते दगडमातीचे असल्याने अनेकदा घोड्यांना अपघात होत असतात व त्यासाठी येथे जिल्हाप्रशासनाच्या अधिपत्याखाली एक पशुवैद्यकीय दवाखाना चालवला जातो. तिथे एक डॉक्टर व एक सहायक उपलब्ध असतो.

या दवाखान्यातील परिसराची दुरवस्था झाली आहे. जनावरांना इलाज करण्यासाठी उभारलेल्या शेडवर निसर्ग चक्रीवादळमध्ये झाड पडल्याने ते मोडकळीस आले आहे, तर दवाखान्याच्या आवरास असलेल्या संरक्षक भिंती मोडून पडल्या आहेत. अनेकदा जिल्हा प्रशासनाकडे पत्र व्यवहार करूनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार येथील नागरिक करत आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व सनियंत्रण समितीकडे पत्रव्यवहार करून सदर जागेचे सुशोभीकरण करण्याचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. साधारण ४२.१६ लाख इतका अंदाजित खर्च या कामी लागणार असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
जनावरांच्या उपचारांसाठी शेड गरजेची

येथे जनावरांवर उपचार करताना शेड महत्त्वाचे असल्याने त्याची ताबडतोब उभारणी व्हायला हवी. त्यासाठी जिल्हाप्रशासनाने शासनमान्य ठेकेदाराकडून हे काम करून घ्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -