शिबानी जोशी
मुंबईतील जोगेश्वरीसारख्या काही उपनगरांमध्ये चांगल्या दर्जेदार राष्ट्रीय विचाराच्या संस्कारक्षम शिक्षणाची १९७० ते ८०च्या दशकात तशी वानवाच होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कार्यकर्ते त्यावेळी जोगेश्वरी पूर्वेला सामाजिक काम करत होते. त्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर सुरुवातीला त्यांनी छोट्या कुडाच्या झोपडीत संस्कार वर्ग सुरू केले. हळूहळू बालवाडी सुरू केली. जोगेश्वरी पूर्वेच्या त्या भागात निम्नमध्यमवर्गीय लोक राहत आहेत, त्याशिवाय थोडं पुढे गेल्यावर अजूनही आदिवासी पाडे अस्तित्वात आहेत. इथल्या गरीब मुलांसाठी संस्कार देणारी मराठी माध्यमाची शाळा सुरू व्हावी, असा हेतू त्यांच्या मनात होता. त्यामुळे या बालवाडी, संस्कार वर्गाचं रूपांतर हळूहळू शाळेमध्ये करण्याच्या दृष्टीनं पावलं पडू लागली.
१९७५ साली संस्कारवर्गाच्या स्वरूपात शाळेची सुरुवात झाली. त्यानंतर दानशुरांच्या मदतीने एक प्लॉट विकत घेऊन त्यावर शाळेच्या इमारतीची उभारणी झाली. सुरुवातीला प्राथमिक, त्यानंतर माध्यमिक, असं करता करता अस्मिता विद्यालयात आज शिशुवर्गापासून दहावीपर्यंतचं संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून दिले जात आहे. २००० साली शाळेची सहा मजली इमारत उभी राहिली. आज सर्वत्र मराठी माध्यमाच्या शाळांची अवस्था बिकट असताना अस्मिता विद्यालयात मात्र विद्यार्थ्यांची संख्या अजिबात कमी झालेली नाही. आजही दरवर्षी साधारण एक हजार मुलं अस्मिता विद्यालयात शिक्षण घेत आहेत. शाळेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, मराठी माध्यमातून शिक्षण घेत असताना इंग्रजी भाषेत विद्यार्थी कुठेही कमी राहू नयेत, यासाठी अगदी बालवाडीपासून इंग्रजी भाषेची ओळख करून दिली जाते. त्यानंतर याच भागात झोपडपट्टी किंवा चाळींमध्ये अपंग मुलं या कार्यकर्त्यांना दिसली. आई घरकाम करते, वडील दारू पितात आणि ही अपंग मुलं कामाची नाहीत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, असं लक्षात आल्यावर अपंग मुलांसाठी नुसते शिक्षण उपयोगाचे नाही, तर त्यांना पैसे मिळवण्यासाठी काहीतरी व्होकेशनल प्रशिक्षण देण्याची गरज आहे, हे लक्षात आले. त्या अनुषंगाने समाजकल्याण विभागामार्फत बोरिवली इथली एक जागा मिळाल्यामुळे अस्मितातर्फे तिकडे अपंग पुनर्वसन केंद्र सुरू झालं आहे. याठिकाणी अपंगांना वेगवेगळ्या कामांचं प्रशिक्षण दिलं जातं. जोगेश्वरी येथे राहणाऱ्या अपंग मुलांची शाळेच्या गाडीने या पुनर्वसन केंद्रात ने-आण केली जाते. याशिवाय त्याठिकाणी अपंग विद्यार्थ्यांना मोफत फिजिओथेरपी, तर बाहेरच्या नागरिकांनाही अत्यल्प दरात फिजिओथेरपी दिली जाते.
आठवी ते दहावीपर्यंतच्या मुलांना व्होकेशनल ट्रेनिंगही दिलं जातं. म्हणजे लँडस्कॅप गार्डन, सॉस मेकिंग, इलेक्ट्रिक असं प्रशिक्षण दिलं जातं. प्रत्येक मुलाला सरकारी एमएससीआयटी (संगणक परीक्षा) बसवलं जातं. त्यामुळे एसएससी पास होताना त्यांच्या हातात एमएससीआयटी प्रमाणपत्रही असतं. महानंद डेरीच्या मागे आजही आदिवासी पाडा आहे. तिथली गरीब मुलं शाळेत येतात. पैशांअभावी ती मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यातील काही मुलांच्या शिक्षणाचा भार काही जण उचलतात. शाळेत यायला लांब पडतं म्हणून मुलं येत नसतील, तर त्यापैकी काहींना शाळेचे शिक्षक आपल्या स्कूटरवरून घेऊन येतात आणि घरीही सोडतात. त्याशिवाय पाड्यामध्येच एक बालवाडीही चालवली जाते. या ठिकाणी मुलांना शिक्षणाबद्दल प्रेम निर्माण करून शाळेत आणण्याचं कामही करावं लागत. पालक व्यसनाधीन असतील, तर ते मुलांकडे लक्ष देत नाहीत, अशा वेळी अस्मिताच्या बालवाडीतील शिक्षिका अक्षरश: या मुलांच्या घरी जाऊन त्यांना शाळेत आणतात. आंघोळ घालून, तयार करून शाळेत बसवतात. अशी दरवर्षी दहा ते पंधरा मुलं या बालवाडीत शिक्षण घेत आहेत. अस्मिता विद्यालयांमध्ये इतर खेळांबरोबरच आर्चरी म्हणजेच धनुर्विद्या हा क्रीडाप्रकारही शिकवला जातो. धनुर्विद्या हा खर्चिक असल्यामुळे बऱ्याच शाळांत तो शिकवला जात नाही. मात्र अस्मिता विद्यालयात विशेषत्वाने शिकवला जातो आणि यापैकी काही मुलं राष्ट्रीय स्तरावरही पोहोचली आहेत.
मराठी माध्यमात विद्यार्थी संख्या कमी होत असताना अस्मिता विद्यालयात मात्र विद्यार्थी संख्येला गळती नाही. खरं तर, संचालक मंडळाकडे अनेक संघटना इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी मदत द्यायलाही पुढे आल्या आहेत; परंतु मातृभाषेत शिक्षण देण्याचाच निर्णय त्यानी कायम ठेवला आहे. शाळेचा गेली पाच वर्षं एसएससीचा शंभर टक्के निकाल लागत आहे. दरवर्षी साधारणपणे एक हजार मुलं अस्मितामध्ये शिक्षण घेत आहेत. अस्मिता विद्यालयामध्ये अतिशय नाममात्र फी आकारली जाते. कोविड काळ लक्षात घेता, यंदा अतिशय किरकोळ फी मुलांकडून आकारली गेली आहे. शाळेमध्ये विज्ञान प्रयोगशाळेबरोबरच गणिताची प्रयोगशाळा, भूगोल प्रयोगशाळा, ॲक्टिव्हिटी होम, संगणक कक्ष, आर्ट होम आहे. त्याशिवाय शाळेमध्ये सर्व सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. शाळेमध्ये केवळ विद्यार्थ्यांकडे नाही, तर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडेही लक्ष पुरवलं जातं. शाळेतील शिक्षक, संचालक मंडळाचे पदाधिकारी व कर्मचारी सर्व कुटुंबाप्रमाणेच एकत्रितपणे काम करतात. विद्यार्थ्यांसाठी जसे सण साजरे केले जातात तसेच शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व कर्मचारी यांच्यासाठी सुद्धा दिवाळीचा सांस्कृतिक उत्सव साजरा केला जातो. यामध्ये यंदा अगदी सफाई कर्मचारीपासून प्रत्येकाला मंचावर येऊन काही सादर करण्यासाठी प्रोत्साहित केलं गेलं होतं. यात त्यांचा एक कर्मचारी खरोखर मनापासून बोलला. तो म्हणाला, ‘आतापर्यंत मी मंचावर केवळ खुर्च्या लावणे, चादरी उचलणे यासाठीच येत होतो. आज मला इथे काही सादर करण्याची, व्यक्त होण्याची संधी मिळाली आहे.’
एखादी शाळा चालवणं म्हणजेच ‘भविष्यातील एक चांगला नागरिक निर्माण करणं’ हा उद्देश अस्मितामध्ये पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो. मुलांचा केवळ शैक्षणिकच नाही, तर सांस्कृतिक, खेळ, शारीरिक विकास व्हावा यासाठीही त्यांना विविध उपक्रमांद्वारे प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जातो. शाळेला आज ४६ वर्षे पूर्ण होत आहेत आणि एका छोट्याशा झोपडीतून सुरू झालेला हा प्रवास मोठ्या इमारतीत रूपांतरित झाला आहे. यानंतर अकरावी-बारावी, ज्युनिअर कॉलेज सुरू करण्याचाही विचार सुरू आहे. पुढच्या वर्षीपासून येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसारही शाळेत विविध उपक्रम तसेच शिक्षणक्रम, पाठ्यक्रम सुरू केले जाणार आहेत. त्यामुळेच विद्यार्थ्यांना सुशिक्षित करण्याबरोबरच त्यांना सुसंस्कृत आणि त्यांच्यात अस्मिता निर्माण करून सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करणारे हे ‘अस्मिता’ विद्यालय आहे, असं म्हणता येईल, नाही का?