Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेमराठा समाजाची माफी मागा; पुन्हा आरक्षण मिळवून द्या!

मराठा समाजाची माफी मागा; पुन्हा आरक्षण मिळवून द्या!

आमदार नितेश राणे यांची ठाकरे सरकारकडे मागणी

ठाणे (वार्ताहर) : महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले असून त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केले पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी केली.

ठाकरे सरकारने दोन वर्षांत मराठा समाजाची कशी फसवणूक केली, याची माहिती देण्यासाठी पक्षातर्फे ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजपचे प्रदेश सचिव संदीप लेले, सरचिटणीस विलास साठे, उपाध्यक्ष सागर भदे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी नितेश राणे म्हणाले, ‘‘ठाकरे सरकारने गंभीर चुका केल्यामुळे आणि सरकारच्या बेफिकिरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले. या सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि नंतर ते रद्द केले. त्यानंतर ठाकरे सरकारने मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केलेले नाहीत. या सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसाठी पाठपुरावा केलेला नाही किंवा न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींनुसार पावले टाकलेली नाहीत. हे सरकार मराठा आरक्षण हा विषयच विसरून गेल्यासारखी स्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, असेच या सरकारचे धोरण दिसते.’’

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप युती सरकारने २०१८ मध्ये कायदा करून मराठा समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणात आरक्षण दिले. त्यामुळे मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकविले. हे सरकार असेपर्यंत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आली नव्हती. तथापि, ठाकरे सरकारला मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षणही टिकविता आले नाही. ठाकरे सरकारने योग्य बचाव केला नसल्यामुळे गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळला गेला. मराठा समाज मागास आहे, हे आता नव्याने सिद्ध करावे लागेल व तसे करताना सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरे द्यावी लागतील, असे नितेश राणे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून खुलासा केल्यामुळे राज्याला मराठा आरक्षणाचे पूर्ण अधिकार आहेत. फडणवीस सरकारने जसा पुढाकार घेतला, तसाच पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाकरे सरकारने पावले टाकायला हवीत. असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

एसटीच्या या सीट बघा. या सीटवर बसून आठ-दहा तास काम करणे किती कठीण असते, ते परिवहन मंत्र्यांच्या लक्षात येईल. एसटी कामगारांची कशी उपेक्षा चालू आहे, हे मंत्र्यांनी तासभर या सीटवर बसल्यावर त्यांना कळेल, अशी जळजळीत प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी एसटीच्या सीटची पाहणी करताना व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -