Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणसिंधुदुर्गात लवकरच ‘एमएसएमई’चे प्रशिक्षण केंद्र : नारायण राणे

सिंधुदुर्गात लवकरच ‘एमएसएमई’चे प्रशिक्षण केंद्र : नारायण राणे

देशाचा अमृत महोत्सव डिसेंबरमध्ये जिल्ह्यात होणार साजरा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या कालावधीत जे सूक्ष्म व लघू मध्यम उद्योग बंद पडले त्यांचा अभ्यास करण्यासाठी एक एजन्सी नेमली आहे. त्या एजन्सीचा अहवाल लवकरच येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी माझ्या एमएसएमई खात्याचे सर्व अधिकारी व कॉयरचे चेअरमन लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असून स्थानिक लोकांना उद्योगधंद्याविषयी प्रशिक्षण व मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी कणकवलीतील प्रहार इमारतीच्या तळमजल्यावर तात्पुरते कार्यालय सुरू करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली.

सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, पुखराज पुरोहित, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत, जिल्हा चिटणीस महेश सारंग आदी उपस्थित होते.

दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यात डिसेंबरमध्ये साजरा केला जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एक मोठा क्रीडा महोत्सव होणार आहे. स्थानिक बेरोजगार व पत्रकारांसाठी लवकरच केरळचा विशेष प्रशिक्षण दौराही आयोजित करण्यात येणार असून कॉयर व अन्य व्यवसायांचे प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

राज्याला विकासाच्या बाबतीत दहा वर्षे मागे नेणारे विद्यमान सरकार पडावे, असे मलाही वाटते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसे म्हणाले असतील, तर ते निश्चितच अभ्यास करूनच बोलले असतील. तसे झाले तर तोंडात साखर पडो, असा टोलाही त्यांनी लगावला.

आम्हाला कोणी धक्के देऊ शकत नाही. गेली अनेक वर्षे मी राजकारणात आहे. आम्ही इतरांना धक्के देतो. येणाऱ्या निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही आमदार व खासदारही भाजपचाच असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सावंतवाडी विधानसभेची आगामी निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडे अनेक उमेदवार आहेत. मात्र सध्या कोणाच्याही नावाची घोषणा केली जाणार नाही. आयत्या वेळीच ते नाव जाहीर करू, मात्र भाजपचा उमेदवार मतदारसंघातील स्थानिकच असे स्पष्ट करतानाच मागील निवडणूक लढविलेला उमेदवारही स्थानिकांमध्येच येतो, असा चिमटाही त्यांनी राजन तेली यांचे नाव न घेता काढला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -