सीमा दाते
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांसह सगळ्याच पक्षाने तयारी सुरू केली आहे. सगळ्यात श्रीमंत महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची इच्छा सगळ्याच पक्षांना आहे आणि म्हणूनच दिवाळीनंतर जोरदार तयारी सर्व पक्षांची सुरू आहे.
गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ महापालिका शिवसेनेकडे आहे आणि भाजपच्या हातात सत्ता जाऊ नये म्हणून सत्ताधारी शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांचेच प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे भाजपकडून जोरदार पक्ष बांधणी सुरू असल्याने याचा फायदा भाजपला होताना दिसणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक वॉर्ड संघटन करताना भाजप दिसत आहे. भाजपचा मुंबईतील जोर पुन्हा एकदा वाढलेला पाहून सत्ताधाऱ्यांनी धास्ती घेतली आहे की काय, असे वाटत आहे.
सत्ताधारी शिवसेना सत्ता आपल्याकडेच कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असले तरी, सध्या महाविकास आघाडी झाल्यामुळे अनेक मुंबईकर नाराज आहेत, मुंबई महापालिकेने अनेक हिताची कामे केली असली तरी खड्डे, रस्ते, पाणी या समस्यांना घेऊन मुंबईकर अद्यापही नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच महाविकास आघाडीमुळे ज्येष्ठ मुंबईकर देखील नाराज आहेतच. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत; मात्र सत्ता मिळवण्यासाठी तिघे एकत्र आले आहेत. यामुळेच खरा शिवसैनिक मात्र दुखावला गेला. त्यातच आता महापालिकेत जर सत्ता काबीज करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे पुढे आले, तर मतदारांना भाजपचाच पर्याय दिसणार हे मात्र नक्की
मुंबईतील अनेक समस्यांना घेऊन मुंबईकर कंटाळलेले असताना भाजपकडून प्रत्येक वॉर्डमध्ये संघटन केले जात आहे, त्यामुळे या निवडणुकीसाठी भाजप देखील जोरदार तयारी करत आहे. महापालिकेतील बैठकीत सातत्याने भाजपने अनके प्रश्न उपस्थित केले, अनेक कामांमधील अनियमितता समोर आणली आहे. यामुळे साहजिकच सामान्य नागरिकांमध्ये देखील भाजपबद्दल विचार सुरू झाले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर महापालिका निवडणूक लढणार असेल तर ही निवडणूक भाजप विरुद्ध तीन पक्ष अशीच पाहायला मिळणार आहे. एका भाजपला बाहेर ठेवण्यासाठी हे तीनही पक्ष तयारी करत असतील, तर नक्कीच भाजपची ताकद मोठी आहे, असेच म्हणावे लागेल.
सत्ता जिंकण्यासाठी मुंबईतील प्रभागांची फेररचना करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला असल्याचा आरोप भाजपने केला होता. इतकेच नाही, तर २२७ हून २३६ नगरसेवक करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. सध्या सगळेच पक्ष पश्चिम उपनगरांवर जास्त लक्ष देत असल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेतील एकूण जागांपैकी सर्वात जास्त १०२ जागा या पश्चिम उपनगरात आहेत. विशेष म्हणजे, २०१७च्या महापालिका निवडणुकीच्या आकडेवारीनुसार पश्चिम उपनगरातील अनेक जागा भाजपकडे आहेत आणि भाजपचा जोर पश्चिम उपनगरात जास्त दिसत आहे. त्यामुळे शिवसेना आता पश्चिम उपनगरातील जागा मिळवण्याच्या तयारीत आहे. मात्र असे असले तरी पश्चिम उपनगरातील भाजपकडील जागा सहजासहजी शिवसेनेकडे जाणार नाहीत. इतकेच नाही तर, भाजपने आधीपासूनच पश्चिम उपनगरात आपला ठसा उमटवून ठेवला आहे, त्यामुळे सेनेला तिथे स्थान राहणार नाही.
दिवाळीनंतर सगळ्या पक्षांनी जोरदार पक्षबांधणी सुरू केली आहे. संपर्क अभियान, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उमेदवार मतदारांच्या घराघरांत पोहोचत आहेत. मुंबईतील दादर, दक्षिण मुंबई इथे मात्र भाजपला जोर द्यावा लागणार आहे. सध्या वरळीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे, मात्र आताची परिस्थिती पाहता वरळी भागातील मतदार शिवसेनेवर नाराज आहे, कोस्टल रोडच्या कामामुळे कोळीवर्ग देखील नाराज आहे. त्यामुळे कुठे तरी भाजपचे सुरू असलेले प्रयत्न सफल होऊ शकतात. त्यामुळे वरळीसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही निवडणूक अटीतटीची ठरणार आहे. भाजप, मनसे आणि सेना हे तीनही पक्ष निवडणुकीत उतरल्याने मराठी मत विभागली जाऊ शकतात. त्यातच मनसे आणि भाजप युतीची चर्चा सुरू आहेच, असे झाले तर त्याचा फायदा वरळीत भाजपला होणार, हे नक्की.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आधीपासूनच तयारी करून ठेवली असून मुंबईसाठी महत्त्वाच्या नेत्यांवर जबाबदारी दिली आहे. आमदार नितेश राणे, प्रसाद लाड, आशीष शेलार, अतुल भातखळकर यांसारखे नेते मैदानात उतरले आहेत. लोकांमध्ये जाणं, संवाद साधणं, समस्या सोडवणं याला ही नेते मंडळी प्राधान्य देत असल्याने घराघरांपर्यंत भाजप पोहोचत आहे. इतकेच नाही तर, महापालिकेत होत असलेला गैरव्यवहार देखील यांनी चव्हाट्यावर आणल्याने या निवडणुकीत भाजपकडे मतदारांचा कौल जाण्याची शक्यता आहे.
भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये फारसा फरक नाही, भाजपचे ८३, तर शिवसेनेचे एकूण ९९ नगरसेवक आहेत. एकूणच काय तर दिवाळीनंतर मोर्चेबांधणीची तयारी सुरू झाली असून उमेदवार लोकांचे प्रश्न घेऊन पुढे येत आहेत. सगळ्यात जास्त प्रयत्न हे विद्यमान नगरसेवकांचे सुरू आहेत.