Saturday, March 15, 2025
Homeताज्या घडामोडीतारापूर एमआयडीसीतील रस्त्यावरच जाळला जातोय प्लास्टिक कचरा

तारापूर एमआयडीसीतील रस्त्यावरच जाळला जातोय प्लास्टिक कचरा

बोईसर (वार्ताहर) : तारापूर एमआयडीसीतील डबल कोला ते टाकी नाका रस्त्यावरील वळणात चक्क प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर पेटवण्यात आला. हरित लवादाच्या नियमावलीला तिलाजंली देत हा प्लास्टिक कचरा जाळण्यात आला आहे. डम्पिंग ग्राऊंडवर ज्या पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते, त्याच पद्धतीने आता अगदी रस्त्याला लागून अशाप्रकारे हा कचरा जाळण्यात आला. या घटनेचा एमआयडीसीतील कामगारांसह सामान्यांमध्ये रोष निर्माण होत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार, कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०००नुसार कचरा पेटवण्यास मनाई करण्यात आलेली आहे. हरित लवादानुसारही कचरा पेटवणे गुन्हा आहे. मात्र, अशाही परिस्थितीत तारापूर एमआयडीसी परिसरातील कचरा रस्त्याला लागूनच अनेकदा पेटवूनच कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. वर्षभरापासून येथील डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा पेटवण्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. दरम्यान, येथील ग्रामपंचयतीतही कचऱ्याची जाळूनच विल्हेवाट लावली जात आहे.

एमआयडीसीत जाणाऱ्या-येणाऱ्या मुख्य रस्त्याला लागूनच मोठ्या प्रमाणावर कचरा टाकून तो जाळला जातो. या कचऱ्यातील घटकांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. तसेच कचरा जाळल्यामुळे अधिक धूर पसरला जात आहे. विशेष म्हणजे, धुराचा प्रभाव वाढत असतानाच अधिकारी मात्र या प्रश्नाकडे पुन्हा कानाडोळा करत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
कचऱ्यामुळे धुरात वाढ
तारापूर एमआयडीसी ही देशातील सर्वाधिक प्रदूषणकारी एमआयडीसी म्हणून बदनाम झाली असताना, तसेच या भागामध्ये प्रदूषणाचा त्रास असतानाच आता त्यामध्ये धुरामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. येथील जवळच्या हॉटेल्समधील शिळे अन्न आणि कचरा अनेकदा रस्त्यावरच टाकला जातो. त्यामुळे योग्य विघटन न झाल्यामुळे आणि कचरा जाळल्यामुळे धुरामध्ये आणखी वाढ होत आहे.

सर्वत्र धुके पडल्यासारखे वातावरण

औद्योगिक विभागातील रसायनांच्या कंपन्यांमुळे एमआयडीसी भागामध्ये अगोदरच मोठ्या प्रमाणात धूर पसरलेला दिसत आहे. यामुळे एमआयडीसी भागामध्ये सर्वत्र धुके पडल्यासारखे वातावरण झाले आहे. या धूरामुळे नागरिकांच्या डोळ्यांनाही त्रास होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -