Monday, July 22, 2024
Homeमहत्वाची बातमीपरिवहनमंत्र्यांना साडी-चोळीचा अहेर

परिवहनमंत्र्यांना साडी-चोळीचा अहेर

आझाद मैदानात मोठा पोलीस बंदोबस्त

विलिनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचारी आक्रमक

मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांकडून शनिवारी परिवहनमंत्री अनिल परब यांना साडी-चोळीचा अहेर देण्यात आला. कर्मचारी त्यांच्या मागण्यावर ठाम असल्याने तसेच आक्रमक पवित्रा घेतल्याने आझाद मैदानात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मैदानाभोवती बॅरिकेड्स लावण्यात आल्या आहेत.

आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत तसेच माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आझाद मैदानात संपकरी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांकडून परिवहनमंत्र्यांना साडी-चोळीचा अहेर देण्यात आला. आंदोलकांना आझाद मैदानाबाहेर जाऊ न दिल्याने उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांमार्फत हा अहेर पोहोचवण्याची विनंती करण्यात आली.

आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन करणारे एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेले असून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. परबांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या मोर्चेकऱ्यांना सध्या आझाद मैदानावरच अडवण्यात आले आहे. तिथे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आझाद मैदानावर मोठ्या बॅरिकेड्स लावून संपकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मुंबईकडे कूच; टोलनाक्यावर गाड्या अडवल्या

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा न निघाल्याने राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात एकत्र यावे असे आवाहन व्हॉट्सअॅपद्वारे करण्यात आले आहे. यामुळे राज्यभरातील संपकरी कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, मुंबईच्या प्रवेशद्वारावर येण्यापूर्वीच या कर्मचाऱ्यांना रोखले जात आहे. आझाद मैदानात संपात सहभागी होण्यासाठी एसटी कर्मचारी राज्यभरातून येत आहेत. मात्र, मुंबईच्या प्रवेशद्वारावर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. टोल नाक्यावर पोलिकांकडून गाड्यांची तपासणी करण्यात येत असून एसटी कर्मचाऱ्यांना रोखून ताब्यात घेतले जात आहे.ही आमच्यासाठी अंतिम लढाई आहे, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही. तोपर्यंत येथून जाणार नाही. तसेच एसटीच्या खाजगीकरणाला आमचा विरोध असेल असं मत एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

ठाकरे सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल : निलेश राणे

एसटी कर्मचाऱ्यांना किती छळणार ठाकरे सरकार. पवार साहेबांना हे सगळं दिसत नाही का? आपल्याच राज्यात एसटी कर्मचाऱ्यांना रोखलं जातंय कारण ते त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. पोलिसांचा वापर करून आंदोलन संपेल, असं त्यांना वाटतंय. पण ठाकरे सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.

सरकारचीच सेवा समाप्त करा : पडळकर

आमदार पडळकर यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधताना, सरकार म्हणतं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन नेतृत्वहीन झालंय, आम्ही बोलायचं कुणाशी? अरे इथं तुमचे हजारो बाप आणि आया बसल्या आहेत, त्यांच्याशी येऊन बोला ना. संपात सहभागी झालेल्या काही कर्मचाऱ्यांचे निलंबन तर काहींची सेवा समाप्त केली जात आहे. तेव्हा कर्मचाऱ्यांनो जागे व्हा. तुमची सेवा समाप्त करणाऱ्या सरकारचीच सेवा समाप्त करा, असे म्हटले.

असा सैतान मंत्री पाहिला नाही : सदाभाऊ खोत

महाराष्ट्राने आजवर अनेक मंत्री पाहिले आहेत.मात्र, असा सैतान मंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही. त्यांना कर्मचाऱ्यांशी देणे-घेणे नाही. केवळ सत्ता हवी आणि त्याच्या माध्यमातून जनतेला लुबाडायचे इतकेच त्यांना ठाऊक आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

समितीच्या निर्णयानंतर निर्णय घेऊ : अनिल परब

न्यायालय नियुक्त समितीने विलिनीकरणाबाबत सकारात्मक अहवाल दिला तर प्रश्न सुटेल. मात्र, अहवाल नकारात्मक दिला तर काय करायचं म्हणून, आताच बोलणे योग्य नाही. त्यामुळे कामगारांनी संप मागे घ्यावा, अशी विनंतीही परिवहन मंत्री परब यांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -