न्यूझीलंडविरुद्धची तिसरी आणि अंतिम टी-ट्वेन्टी आज
रांची (वृत्तसंस्था) : आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील अपयशातून बोध घेत सांघिक कामगिरी उंचावणाऱ्या भारताने मायदेशात सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसरी आणि अंतिम लढत रविवारी (२१ नोव्हेंबर) कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळली जात आहे. फॉर्मात असलेल्या रोहित शर्मा आणि सहकाऱ्यांना सातत्य राखताना निर्भेळ यश (व्हाइटवॉश) मिळवण्याची संधी आहे. दुसरीकडे, मालिका हातची गेली तरी पाहुणा संघ मालिकेचा शेवट गोड करतो का, याची उत्सुकता आहे.
सर्व आघाड्यांवरील सर्वोत्तम कामगिरी हे भारताच्या होमग्राउंडवरील मालिका विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे. कर्णधार रोहित शर्माने त्याची प्रत्येक भूमिका चोख बजावली. जयपूरमध्ये अर्धशतकाने हुलकावणी दिली तरी रांचीमध्ये शानदार हाफ सेंच्युरी ठोकली. त्याला सहकारी लोकेश राहुलने चांगली साथ दिली. आघाडी फळी बहरण्यात सूर्यकुमार यादवचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. श्रेयस आणि वेंकटेश या अय्यर दुकलीला संधीचे सोने करता आले नाही. तिसऱ्या लढतीत आयपीएल गाजवणाऱ्या ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
गोलंदाजीत अनुभवी मध्यगमती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि ऑफस्पिनर आर. अश्विनने सातत्य राखले आहे. मध्यमगती हर्षल पटेलने दुसऱ्या सामन्याद्वारे दमदार आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. अन्य मीडियम पेसर दीपक चहर ओेके आहे. मात्र, अनुभवी डावखुरा स्पिनर अक्षर पटेलने निराशा केली आहे. त्याच्या जागी तिसऱ्या सामन्यात लेगस्पिनर युझवेंद्र चहलला संधी मिळू शकते.
टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर केवळ तिसऱ्या दिवशी भारतात मॅच खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाला खेळपट्टी आणि वातावरणाशी जुळवून घेण्यास फारच कमी कालावधी मिळाला. त्यातच नियोजित कर्णधार केन विल्यमसन आणि काइल जॅमिसनची अनुपस्थिती त्यांना प्रकर्षाने जाणवली. अनुभवी मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमनने प्रत्येकी एकेकदा पन्नाशी पार केली तरी डॅरिल मिचेलला सातत्य राखता आले नाही. दोन सामने मिळून तो केवळ ३१ धावा जमवू शकला. आघाडीच्या फळीत अपेक्षित योगदान देण्यात ग्लेन फिलिप्सला (३४ धावा) अपयश आले. टिम सीफर्टनेही निराशा केली. पाहुण्यांची गोलंदाजीही तितकी प्रभावी ठरली नाही. कर्णधार टिम साउदीने २ सामन्यांत ४ विकेट घेतल्या तरी कामगिरी लौकिकाला साजेशी नाही. अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टही अपयशी ठरला. टॉड अॅस्टल आणि डॅरिल मिचेलही भारताच्या फलंदाजांना रोखू शकले नाहीत.
सलग दोन पराभवांमुळे मालिका पराभव नक्की असला तरी आगामी दोन सामन्यांची कसोटी मालिका पाहता किमान गोड शेवट न्यूझीलंडला आत्मविश्वास उंचावण्यासाठी पुरेसा ठरेल.
वेळ : सायं. ७ वा.