बिलासपूर (वृत्तसंस्था) : धर्मांतर नाही, आम्ही जगण्याची योग्य पद्धत शिकवतो, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. छत्तीसगडमध्ये मुंगेली जिल्ह्याच्या मदकू भागात आयोजित ‘घोष शिबिरा’त हिंदू धर्म आणि धर्मांतराविषयी त्यांचे मत मांडले. शिवनाथ नदीत स्थित मदकू बेटावर हे शिबीर झाले.
‘हिंदू धर्म कुणाचीही पूजेची पद्धत, प्रांत किंवा भाषा न बदलता व्यक्तीला चांगलं वागण्याचं शिक्षण देतो’ असं म्हणत त्यांनी हिंदू धर्माची आपली व्याख्या उपस्थितांसमोर मांडली. सोबतच, ‘विश्वगुरु भारताच्या निर्माणसाठी आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागेल. आम्ही कोण आहोत, आम्ही जगतसत्य जाणणाऱ्या ऋषी-मुनींचे वंशज आहोत, आम्ही संपूर्ण जगाला आपलं कुटुंब मानणारे लोक आहोत. आपल्या व्यवहारातून हेच सत्य आपल्याला सगळ्या जगासमोर मांडायचं आहे. आम्ही पुन्हा देश-विदेशात, संपूर्ण जगभर फिरू… आणि तेव्हापर्यंत विज्ञानाच्या सहाय्यानं चंद्रावर मंगळवार आपण पोहचू शकलो तर आम्ही तिथेही जाऊ…’ असं म्हणत भागवत यांनी हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसारावर जोर दिला.
‘हरवलेलं व्यवहाराचं संतुलन परत देणारा हा धर्म आहे, जो पर्यावरणासोबत योग्य व्यवहार शिकवतो. जो पंथ-पूजा, जात-पात, जन्म, देश, भाषा इत्यादी विविधतेनंतरही एकत्र राहण्यास शिकवतो. जो कुणाची पूजेची पद्धत न बदलता, प्रांत किंवा भाषा न बदलता व्यक्तीला चांगलं वागण्याचं शिक्षण देतो. जो सगळ्यांना आपलं मानतो, कुणालाही परकं समजत नाही, असा जो धर्म आहे ज्याला लोक ‘हिंदू धर्म’ म्हणतात तो आपल्याला सगळ्या जगापर्यंत पोहचवयचा आहे. मतांतरण करायचं नाही… तर ही पद्धत शिकवायची आहे… ही पद्धत म्हणजे पूजेची पद्धत नाही तर जगण्याची पद्धत आहे. सगळ्या जगापर्यंत हा धर्म पोहचवण्यासाठी आपला जन्म भारतात झालाय ‘ असं म्हणत हिंदू धर्माचं महात्म्य समजावून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला.