Thursday, October 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाजअनाथांचा नाथ

अनाथांचा नाथ

कथा : डॉ. विजया वाड

त्यांची गोष्ट वेगळी होती. त्यांना ‘नाथा’ होता. अनाथांचा नाथ. “कधी म्हणू नका. मी नाथाचा आहे. माझी आई धरतीमाता, माझा बाप नाथ आहे.” असं शिकवायचा आई-बाप नसलेल्या पोरांना त्याला कारण तसं खास विश्वनाथांनी त्याला दत्तक घेतलं होतं, पण विश्वनाथांच्या पत्नीने प्रतिपाळ केला होता, तो ‘बिचारा अनाथ’ म्हणून सांगून सवरून. कधी कमी केले का? नाही. पण सांगे ‘बिचारा अनाथ’ आहे. ‘मी प्रतिपाळ करते’ असा सांगावा धाडे. सांगावा सर्वत्र पसरला होता. नाथा ज्यावेळी स्वत:च्या पायांवर उभा राहिला. त्याने सर्व २ मुले दत्तक घेतली अनाथालयातून. अनाथ ठेवलेले लेबल पुसून सनाथ केले. त्यातलाच एक सुनाथा नि दुसरा बाप्पा! सुनाथा गोरापान, बाप्पा श्यामल. सुनाथा प्रगतीत बरा, बाप्पा सर्वात पुढे. फार पुढे! इतका पुढे… की प्रगतीने दौडीत दमावे. एकवचनी, एकपाठी, एकलक्षी… सारंच औरी!

बाप्पाला सर्व पुस्तके पाठ होती. उभी-आडवी! सुनाथा प्रगतीत बरा होता, पण माणूस म्हणून फार मोठा होता.

‘अनाथांचा नाथ, भार बाप्पा सुनाथा!
कोणी द्रवी त्याला, दु:ख घेई हाता…
नाही कुणा रडवे, बघू शके सुनाथा
माणुसकीचे घमेले डोईवरी आता!’

सुनाथाने पोरगं दत्तक घेतलं, “बिचारा आई बापाविणा आहे” घरी आणले. सुनाथाने विचार केला नाही, की याचा प्रतिपाळ कोण कसे करेल? सुनाथाने सोमवतीच्या हाती सोपवला.

आईनेही प्रतिपाळ केला. घासातला घास काढून. अर्धेच जेवण स्वत: जेवून. त्याचे काय नाव ठेवावे? मग विसोबा नाव ठेवले. विश्वनाथ बाप, सोमवती आई. विसोबा तिसरा पुत्र. विसोबा भराभरा शिकला, मोठा झाला, लग्न लावले आणि बायकोचे डोके सुजले. ‘आम्ही पोसावे का त्याचे आई-बाप? तिन्ही मुलांनी ४-४ महिने वाटून घ्यावे.’ झाले.

ठरले की! ४-४ महिने आई-बाप वाटले गेले. चार महिने होत आले, मोठी सून हाय हुस् करू लागली. ‘मधलीकडे जा’ म्हणू लागली. अळं टळं जेवणाची! चहापाण्याची! चणचण भासू लागली.

बिचारे आई-बाप बाहेर निघाले. मुलगा बायकोच्या अधिन होता. गप्प गप्प बसून बघत होता.

मधलीचे धाबे दणाणले. चार महिने आई-बाप पोसायचे? अरे है क्या? खाना-खजाना खोला क्या हमने? मधली कां कूं करू लागली. मधला गप्प गप्प!

ट्रंक-वळकटी घेऊन आई-बाप हजर झाले. ट्रंकेची चावी सासरे बुवा जानव्यात ठेवीत. सारखे दार लावून पैसे मोजत. सून भोकातून बघे. नाण्यांनी भरल्या थैल्या. रोज काय मोजायच्या? छन छन छन तिला गंमत वाटे.

एकदा सासू-सासरे फिरायला बाहेर पडले. हिने किल्लीवाल्याला बोलावून कुलूप उघडले. त्या नोटांच्या ट्रंकेचे. नाणीच नाणी! बॅगभर नाणी! नि खाली दोन मोठे दगड. बाप रे! हे दगड? कशाला? कसे? आमच्या डोक्यात घालणार बहुधा. आम्ही झोपलो की! मग ती जागसूद झोपू लागली. सासू-सासरे, दोघांकडे संशयाने पाहू लागले. नवऱ्यास बजावले.

“४ महिने होताच सायंकाळी धाकला दीर आहे, त्याकडे पोहोचवा.” “का गं?” नवरा बिचारा! प्रश्न केलान् बायकोला. “ते सासू-सासरे मोठे दगड बॅगेत ठेवून आहेत. जपून वागा!

आई-बाप, आई-बाप म्हणता, तो दगूड डोक्यात घालून, आपला खून करतील.” इतका धोसरा इतका धोसरा; की मुलास खरे वाटू लागले. आपले मायपिता असे दुष्ट कृत्य करतील? तो आपल्या खोलीस आतून कडी लावून झोपू लागला. आई-बाप बिचारे!

हळूहळू सुनेला हाव सुटली. रात्रीचे जेवण बंद झाले. म्हणजे आई-बाप उपाशी. नि ही नि नवरा तुपाशी! नवऱ्यास पत्ताच नव्हता. सारा छळ मुकाट चालू होता. एक दिवस देवळातून घरीच आले नाहीत. कशासाठी जावे? उपाशी ठेवते रोज. मुलास कसे सांगावे?

मुलास दु:ख होईल. उपासतापास करू लागेल. नको नको. त्यापेक्षा घर नको. देवळात भले! प्रसाद मिळतो गोड गोड. पोट भरत नाही. पण थोडा फार आधार मिळतो. जेवणाच्या बदल्यात “ढेरीभर प्रसाद खातात, नि जेवण फुकट घालवतात.” सून फूस लावी. “आता शिजवीतच नाही.” सबबी सांगे. मुलगा रागावे आई-बापांवर. चित्र रंगवावे तसे रंगते. बिघडवले, तर बिघडते. विस्कटले तर विस्कटते. आई-बाप उपाशी राहू लागले, तरी मरत नव्हते. दिवसा पोटभर जेवत होते. मुलगा बघत राही. किती हे खाणं? चरण? कोंबणं?

देवळात एक श्रीमंत तरुण येई. रोज मायबापांना बघे. त्यास कोणी नव्हते. एक दिवस त्या दोघांना घेऊन गेला. पाच पक्वान्ने खाऊ घातली. “आता राहा मजकडे.” “मला कोणी नाही.” उपाशी तापाशी घरी राहण्यापेक्षा इथेच राहू. छळ तरी होणार नाही. उपाशी आई-बापांना घर ‘नवे’ लाभले. तब्येत छान सुधारली. प्रेमासारखे दुसरे शक्तिवर्धक नाही हेच खरे.

मुलगा शोधून दमला. हळूहळू विसरला. बायकोच्या अधीन झाला. मुलगा बायकोला मुलगी जन्माला हेच खरं! सन इज फॉर वाईफ अँड डॉटर इज फॉर लाईफ हेच खरं! अगदी सत्य! इंग्रजीत नव्हे तरी सार्वत्रिक सत्य.

तर ‘इंग्रजी’ रूप असलेला श्रीमंत माणूस त्यांना घरी घेऊन गेला आणि पोटभर पाहुणचार केला. “आता रोज तुमचे चरण या घरास लागू देत”, “मी गाडीने घरी, आलिशान सोडतो.” त्याची इंपाला घरी घेऊन गल्लीबोळात शिरली. मुलगा, सून चकित! मुलाचे फार मोठे साहेब होते ते. सून तर नमूनच गेली; जेव्हा ते आई-बाबांच्या पाया पडले.

“माझे भाग्य थोर! मला नव्याने आई-बाप लाभले.” त्यांचे आई-बाबा स्वर्गात होते. “यांना सोन्याची ठेव म्हणून जपा. कधी दु:ख देऊ नका. दु:खाचा वाराही नको. स्पर्शही नको.” पुन्हा पुन्हा बजावले. निघून गेले. “आता कंपल्सरी लाड हावरटांचे.” सून म्हणाली. “लाड नकोत. राहू देत. माणसासारखं वागवा!” बाबा कडकपणे म्हणाले. “असं का कुजकं नासकं बोलता?” सून करदावली. “अगं रोज सायंकाळी उपाशी ठेवतेस! वाटायला पाहिजे! काहीतरी लाज!”

मुलासमोर शोभा नको; म्हणून सून गप्प गप्प! ऐकून घेतलंन्. “आता जेवा.” पोटभर जेवण दिले. सायंकाळ-रात्र छान गेली. आई-बाप खूशम् खूश! “हे दगड कशास ट्रंकेत ठेवलेत बाबा?”

मुलाने विचारून टाकले. “अरे, आमच्यासाठी आहेत ते! फार जीवास लागले, तर दगड डोक्यात घालून जीव संपवावा!” सुनेस जीवास लागले. ती काही त्यांच्या जीवावर उठली नव्हती. छळ करताना जीव घ्यावा, असे मनी नव्हते.

“असं का बोलता?” मुलगा रडू लागला. स्फुंदून स्फुंदून रडू लागला. तसे आई-बाप विरघळले. अनाथांचा नाथ झालेला, तो श्रीमंत माणूस, पाहुणचार म्हणून आई-बाबांना घेऊन गेला. सून एकटी झाली. नवरा दुकान चालेना म्हणून घरी होता. जेवाखायचे हाल चालू झाले. आई-बाप मात्र साजुक नाजुक, तुपाशी जेवत होते. “एक अनाथालय उघडूया. माझ्या भारी मनात आहे.” बाबा म्हणाले.

अन्नान्नदशा झालेली गरीब माणसे ‘नाथा’मध्ये जेवू लागली. आशीष देऊ लागली. एक दिवस नवरा-सून त्या ‘नाथा’त आले. पोटभर जेवले. आई-बाप देखरेख करीत होते. ते लाजले. शेवटी कीर्तन झाले. मुलगा-सून थांबले.

‘अनाथांचा नाथ झाला, एकलाच घरी
खूश झाली मुले, माणसे, खूश झाल्या पोरी
अन्न वस्त्र मिळाले, सारी लयलूट
कशालाही कमी नव्हते, सारी भरे तूट
वस्त्रालंकारे सारी, नटलेली सजलेली माणसे
भरे पीक समृद्धीचे, टंच भरलेली कणसे.’
गाऊ ईश्वराचे गान, ईश्वर ही सर्वसाक्षी
दूर गगनी भरारी, घेतसे गरुड पक्षी.
अनाथांचा नाथ वाढी, पंगतीत साऱ्या
खूश करी मुले, जैशा पंख लाविल्या पऱ्या!

आई-बाप सुनेस म्हणाले, “बरे चालले आहे ना? आमच्याविणा?”

“चुकले हो मी! साफ चुकले” सून पाया पडली.

मग सारे गोड झाले. श्रीमंत माणूस ते बघून म्हणाला, “राहा येथे. मी अनाथांचा नाथ आहे.” ज्यांचा नाथ आहे तो अनाथ कसा? मुलगा, सून समजले, काम करू लागले. झडझडून. आळस सोडून. साठा उत्तराची कहाणी अशी संपन्न झाली.

सारे सुख सुख जाहले. इति अलम्.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -