सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रौत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली माऊलीच्या जत्रौत्सवासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व इतर राज्यातूनही भाविकांनी गर्दी केली आहे. कोरोनाचे सावट, पावसाची रिपरिप व एसटीचा बंदमुळे यावर्षी भाविकांची संख्या थोडी कमी असली तरीही भाविकांचा उत्साह मात्र कायम होता.
जत्रौत्सवानिमित्त सकाळपासूनच दर्शनासाठी व देवीची ओटी भरण्यासाठी शेकडो भविकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र, पोलिस प्रशासनाबरोबरच देवस्थान कमिटी व स्थानिक भक्त मंडळाने योग्य ते नियोजन केलेले असल्यामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन घेता आले. रात्री हजारो भाविकांनी देवीच्या चरणी लोटांगणे घालून आपला नवस फेडला. यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे उत्सवमुर्तीवर पहाटे दुग्धाभिषेक व विधीवत पूजन झाल्यानंतर रांगेने भक्तांना प्रवेश देण्यात आला. सकाळपासूनच भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती. तर दुपारनंतर ती अधिकच वाढली.
लोटांगणापूर्वी संपूर्ण दिवस माऊलीच्या गाभाऱ्यात ओट्या भरणे तसेच नवस बोलण्याचा कार्यक्रम सुरु होता. रात्री देवीचा कौल घेऊन मंदिराच्या सभामंडपाच्या पायरीपासून लोटांगणाला सुरूवात झाली व मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करीत त्याच पायरीपर्यंत येऊन पूर्ण केली.