Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजआझाद मैदान ते अमरावती

आझाद मैदान ते अमरावती

स्टेटलाइन : सुकृत खांडेकर

नऊ वर्षांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर रझा अकादमीने मोठी हुल्लडबाजी आणि हिंसाचार केला आणि त्यानंतर आता अमरावतीत घडलेल्या हिंसाचारात रझा अकादमीचे नाव झळकले. रझा अकादमी सतत वादाच्या भोवऱ्यात असते, पण राज्यात आलेल्या कोणत्याच सरकारची त्यावर कठोर कारवाई करण्याची हिम्मत झाली नाही. रझा अकादमीवर कारवाई करायला पोलीस – प्रशासन घाबरते की राज्यकर्ते मुस्लीम वोट बँकेला दुखवायचे नाही, म्हणून कारवाई करायला राजी नसतात?

रझा अकादमीची स्थापना १९७८ मध्ये अलहाज सईद नुरी यांनी केली. अकादमीची स्थापना सुन्नी बुद्धिमतांची विशेषत: इमाम-ए-अहमद रझा खान कादरी व इतरांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी झाली. अकादमीने उर्दू, अरबी, हिंदी आणि इंग्रजीत विविध इस्लामिक विषयांवर असंख्य पुस्तके प्रकाशित केली आहेत. अलहज मोहम्मद सईद नुरी हे रझा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

आझाद मैदानावर हिंसाचार झाला तेव्हा रझा अकादमी प्रथम वादात आली. म्यानमार व आसाममध्ये मुस्लिमांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ रझा अकादमीने ११ नोव्हेंबर २०१२ रोजी आझाद मैदानावर रॅली आयोजित केली होती. काही मौलवींनी या रॅलीत चिथावणीखोर भाषणे केली. तरुणांची उपस्थिती मोठी होती. रॅलीतील भाषणांनी उत्तेजित होऊन जमावाने तोडफोड, जाळपोळीला सुरुवात केली. आझाद मैदान, सीएसटी परिसरात हिंसक दंगलीचा डोंब उसळला होता. अमर जवान या शहीद स्मारकावर लाथा मारून तोडफोड केली. जाळपो‌ळीत पोलिसांच्या २६ वाहनांची हानी झाली. पोलिसांच्या हातातील शस्त्रे हिसकावून घेण्याच्या घटना घडल्या. बेस्टच्या ५० बसेसची मोडतोड झाली. रस्त्यांवरील शेकडो खासगी वाहनांची नासधूस झाली. धर्मांधांनी महिला पोलिसांच्या अब्रूवर हात घातला. पोलीस व्हॅनमध्ये असलेल्या महिला पोलिसांना जमावाने खेचून बाहेर काढले. त्यांचे कपडे फाडले. महिला पोलिसांचा विनयभंग होऊनही तेव्हाचे सरकार दंगलखोरांपुढे हतबल झालेले दिसले. पोलीस, मुंबई महापालिका, बेस्ट, अग्निशमन दल यांचे दंगलखोरांकडून जवळपास चाळीस लाखांचे नुकसान झाले, पण नऊ वर्षे उलटली तरी एक रुपयाही वसूल झालेला नाही. विशेष म्हणजे, दंगलखोर अजूनही मोकाट आहेत. साठ आरोपी आहेत. ते मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे राहणारे आहेत. पण त्यांनी दिलेल्या पत्त्यांवर बहुसंख्य राहातच नाहीत. झालेल्या नुकसानीची कोण कोणाकडून वसुली करणार? आणि त्या धर्मांध दंगलखोरांवर कोण कधी कारवाई करणार? याचे उत्तर मिळत नाही. हिंसाचार घडविणाऱ्या धर्मांधांना तेव्हाच चाप लावला असता, तर आज अमरावतीत धुडगूस घालण्याची कोणाची हिम्मत झाली नसती.

बांगलादेशात जे काही घडले त्याची प्रतिक्रिया त्रिपुरात उमटली, पण त्रिपुरात जे घडलेच नव्हते त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. काश्मीरमध्ये पंडितांना किंवा बिगर काश्मिरींना हल्ल्यांचे लक्ष्य बनवले जाते. मेघालयात सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले होतात. मुळात त्रिपुरातील घटनेचा महाराष्ट्राशी काय संबंध? नांदेड, मालेगाव, भिवंडी, अमरावती येथे हजारो लोक रस्त्यांवर का उतरले? त्यांना कोणी उतरवले? त्यांची माथी कोणी भडकावली? या सर्व संवेदनशील भागांत जमावबंदी, संचारबंदी, इंटरनेट बंदी जारी झाली. जे काश्मीरच्या खोऱ्यात निर्बंध आहेत, तशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते आहे का? अमरावतीत भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे, भाजपचे महापौर चेतन गावंडे, तुषार भारतीय आदी डझनभर प्रमुख नेत्यांना अटक झाली. रझा अकादमी हे भाजपचे पिल्लू आहे, असा आरोप महाआघाडीच्या नेत्यांनी केला. जे भाजपला पाहिजे आहे, ते रझा अकादमी घडवते, असेही या नेत्यांनी सांगितले. एवढेच नव्हे, रझा अकादमी व भाजप नेत्यांचे एकत्र असलेले जुने-पुराणे फोटोही मीडियाला दिले. अगोदर रझा अकादमी व अन्य मुस्लीम संघटनांनी काढलेला मोर्चा व नंतर भाजपने पुकारलेला बंद यात कोण भरडले गेले? महाराष्ट्रात जातीय दंगली घडवून भाजपला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत राजकीय लाभ मिळवायचा आहे, असाही शोध महाआघाडीच्या नेत्यांनी लावला.

त्रिपुराचे कारण सांगून निघालेल्या मोर्चात कोणी शांतिदूत नव्हते. दगडफेक, जाळपोळ, तोडफोड झालीच. दंगलीचे सूत्रधार कोण? या विषयावर सरकार मूग गिळून आहेत. गुप्तचर यंत्रणेला माहिती होती, पण एवढे मोठे काही होईल याची कल्पना नव्हती, असे सरकार सांगते. उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये झालेल्या हत्याकांडावरून महाविकास आघाडीनेच महाराष्ट्र बंद पुकारला होता. मग त्रिपुरातील तथाकथित घटनेवरून रझा अकादमीने मोर्चे काढले, तर त्यांना हे सरकार रोखणार तरी कसे? मुळात, रझा अकादमीने व अन्य मुस्लीम संघटनांनी जे मोर्चे काढले, त्यासाठी पोलिसांची रितसर परवानगीच घेतली नव्हती. तरीही सरकार हात चोळत बसले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर अडीचशे जण मोर्चाने येणार, असे आयोजकांनी म्हटले होते. मग मोर्चात वीस-पंचवीस हजार जण कसे आले? अमरावतीच्या दंगलीला मुंबईतून पैसा पुरविण्यात आला, असे सरकारमधील मंत्रीच सांगतात. मग कोणी पुरवला, किती पुरवला, कोणाला दिला, हे कोण सांगणार? अमरावतीच्या रस्त्यावर हजारोंचा हिंसक जमाव उतरेल, याची कोणाला कल्पना नव्हती. पोलीस व प्रशासनाचा धाक नसल्याने दंगलखोर मोकाट होते. राज्यात तेवीस संघटनांनी १११ ठिकाणी निषेध सभा, मोर्चे काढले, पण मालेगाव, नांदेड व अमरावती या तीनच ठिकाणी हिंसक वळण लागले, असे सांगून प्रशासन त्याची तीव्रता कमी करू बघत असेल, तर ते धोकादायक आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीवर रझा अकादमीने संशय व्यक्त केला होता. मौलाना नुरी यांनी थेट जागतिक आरोग्य संघटनेला पत्र लिहून (३० जानेवारी २०२०) व्हॅक्सिनमध्ये डुकराच्या चरबीचा वापर केला आहे का?, असे विचारले होते. तसे असेल, तर कोणीही मुस्लीम व्यक्ती लस घेणार नाही, असे म्हटले होते. रझा अकादमीने २३ मार्च २०२० रोजी राज्यपालांना पत्र लिहून राजभवनातील मशिदीत सर्वसामान्यांना नमाज पढू द्या, अशी मागणी केली होती. मोहम्मद पैगंबरांचे कार्टून काढणाऱ्या स्वीडिश कार्टूनिस्ट लार्स विक्स यांच्या मृत्यूनंतर रझा अकादमीने त्यांच्या मृत्यूचे सेलिब्रेशन केले होते. वादाच्या भोवऱ्यात असलेल्या रझा अकादमीपुढे सरकार हतबल आहे का?…

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -