कोकणी बाणा : सतीश पाटणकर
अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय हा खूपच फायदेशीर लघू उद्योग आहे. घरामध्ये कोणताही धार्मिक प्रसंग असला की कापूर, उदबत्ती, निरांजन यांना अपार महत्त्व असते. अगदी रोजच्या देवपूजेच्या वेळीही उदबत्तीच्या सुवासाने, घरात पावित्र्याचं आणि मांगल्याचं वातावरण निर्माण होतं. गरीब असो की श्रीमंत, उच्च असो की नीच, प्रत्येकालाच उदबत्तीची माहिती आहे. त्यामुळे उदबत्तीची मागणी कधीही न संपणारी असल्यामुळे एक लघू उद्योग म्हणून अगरबत्ती दररोज विकसित होत असलेला उद्योग आहे.
अगरबत्ती उद्योगासाठी लागणारा कच्चा माल कोणत्याही स्थानिक बाजारपेठेतून वर्षभर स्वस्त किमतीत उपलब्ध होत असतो. या उद्योगासाठी सुवासिक लाकूड, मुळ्या, साली, पाने, चंदन, अगरू, कोळसा, लवंग, दालाचिनी, निलगिरी, गुलाब, मोगरा, चमेली, रातराणी अर्क, धूप, कापूर, केवडा, कंकोळ, तुळस, अटामसी, मारवा, नागरमोथा, बुक्का, भाताचे तूस, व्हाईट ऑईल, ग्रीस, लुबिकेटिंग ऑईल, सोरा डिंक, गोंद-खळ, स्टार्च बांबू किंवा वेळूच्या कामट्या आदी कच्चा माल अगरबत्ती तयार करण्यासाठी लागतो. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ राज्यांसह विविध ठिकाणी अगरबत्ती लघू उद्योगाची निर्मिती होत आहे. या उद्योगासाठी साधारण ७० ते ८० हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. उद्योग सुरू केल्यानंतर खर्च कमी- अधिक होऊ शकतो. या उद्योगासाठी बँक आपली योग्य पत पाहून कर्ज पुरवठा करते. हा लघू उद्योग केल्यामुळे आपला अधिक फायदा होऊ शकतो. अगरबत्ती उत्पादन व्यवसाय बाजाराची व्याप्ती भारताच्या आत मोठी बाजारपेठ आहे, कारण अनेक समुदाय भारताच्या आत राहतात आणि अगरबत्तीचा वापर सर्व धार्मिक आणि सामाजिक कार्यांमध्ये केला जातो आणि अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय हा एक व्यवसाय आहे, ज्यामध्ये लोकांचा विश्वास आणि भावना असतात, ज्यामुळे हा व्यवसाय कधीही कमी होणार नाही.
केवळ भारतीयच नव्हे, तर अनेक देशांमध्ये अगरबत्ती वापरल्या जातात. जसे की लंडन, मलेशिया, नेपाळ, भूतान, वर्मा, मॉरिशस, श्रीलंका इत्यादी परदेशातही अगरबत्तीचा वापर केला जातो, त्यामुळे अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय हा अखंड व्यवसाय आहे. तुम्ही १३००० रुपये खर्च करून हा व्यवसाय घरीच तयार करून सुरू करू शकता; परंतु जर तुम्ही मशीनवर बसून उदबत्तीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ते सुरू करण्यासाठी सुमारे ५ लाख रुपये खर्च येतील. मॅन्युअल मशीनची किंमत १४ हजार रुपयांपर्यंत, सेमी ऑटोमॅटिक मशीनची किंमत ९० हजार रुपयांपर्यंत आहे. हायस्पीड मशीनची किंमत सुमारे १.१५ लाख रुपये आहे. मॅन्युअल मशीन चालवणे खूप सोपे आहे, ते डबल आणि सिंगल पेडल दोन्ही प्रकारचे आहे. त्याची किंमत देखील कमी आहे, तसेच ती टिकाऊ आणि उत्तम दर्जाची आहे. अशा अगरबत्ती बनवणाऱ्या मॅन्युअल मशीनच्या मदतीने उत्पादन चांगल्या दर्जासह सुधारता येते. जर तुम्हाला अगरबत्तीचा मोठा व्यवसाय करायचा असेल, तर स्वयंचलित मशीन तुमच्यासाठी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य पर्याय असेल. हे मशीन तुमच्या गरजेनुसार बाजारात उपलब्ध नमुन्यांची, डिझाइन्स आणि आकारांच्या चांगल्या प्रकारात येते. स्वयंचलित मशीनचा फायदा म्हणजे या मशीनद्वारे १५० ते १८० उदबत्ती एका मिनिटात तयार करता येतात. या मशीनमध्ये सरळ, गोल आणि चौरस प्रकारच्या काड्या उदबत्तीसाठी वापरता येतात. हायस्पीड मशीन या प्रकारच्या मशीनमध्ये तुम्हाला कमी कामगारांची आवश्यकता असेल. हे पूर्णपणे स्वयंचलित मशीन आहे. याचा वापर करून किमान वेतन खर्चात जास्त उत्पादन मिळवता येते. या मशीनद्वारे एका मिनिटात ३०० ते ४५० उदबत्त्या तयार करता येतात. या मशीनमध्ये अगरबत्तीची लांबी ८ ते १२ इंच ठेवता येते.
सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने अगरबत्ती तयार करणाऱ्या कारागिरांना विविध स्तरावर पाठबळ देऊन या उद्योगाच्या विस्तारासाठी आणि उदबत्ती निर्मिती क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या हेतूने ४ सप्टेंबर २०२० रोजी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. यामुळे अगरबत्ती निर्मिती व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर मदत मिळू शकणार आहे.
अगरबत्ती बनविण्यासाठी स्वयंचलित यंत्राचा पुरवठा करण्यात येणार आहे. अगरबत्ती बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल नियमित पुरविणे सुनिश्चित करण्यात येणार आहे. अगरबत्ती निर्मितीसाठी आधी २०० स्वयंचलित यंत्रांचा पुरवठा करण्यात आला होता. आता ४०० यंत्रे संबंधित संस्थांना देण्यात येणार आहेत. तसेच सायकलप्रमाणे पायाने चालविता येणारी अतिरिक्त ५०० यंत्रे स्वमदत समूहांना देण्यात येणार आहेत. अगरबत्ती निर्मिती क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी देशभरामध्ये २० पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये अगरबत्ती निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची पुरवठा साखळी तयार करणे तसेच बनलेल्या मालाचे व्यावसायिक पद्धतीने विपणन करणे, यांचा समावेश आहे. सरकारने अगरबत्ती कारागीर विकास कार्यक्रमाला व्यापक स्वरूप दिले असून यासाठी सरकार आता ५५ कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहे. मंत्रालयाच्या पारंपरिक उद्योगांच्या पुनर्रचनेसाठी ‘स्फूर्ती’ या योजनेच्या अंतर्गत देशामध्ये अगरबत्ती निर्मिती उद्योगासाठी १० केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी ५० कोटी सरकार खर्च करणार आहे. त्याचा लाभ देशातल्या सुमारे ५००० अगरबत्ती कारागिरांना होणार आहे. या क्षेत्रामध्ये खादी आणि कुटिरोद्योग आयोगाच्या वतीने हाताने अगरबत्ती करणाऱ्या आणि स्वमदत समूहांमधल्या कारागिरांना मदत करण्यात येणार आहे. अगरबत्ती कारागिरांना प्रशिक्षण, कच्चा माल, विपणन यासाठी मदत करणे आणि सातत्याने पाठिंबा देणे. अगरबत्ती उत्पादनाच्या सर्व बाबींवर कार्य करणे. यामध्ये सुगंधासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबविताना पर्यायी कच्च्या मालाच्या फेरवापराचा विचार करणे. वाहिलेल्या फुलांचा वापर करणे, काथ्याचा वापर, त्याचबरोबर कृषी मंत्रालयाच्या मदतीने बांबूच्या काड्या उपलब्ध करून देण्यासाठी काम करण्यात येत आहे. कन्नौज हे सुगंधाचे केंद्र स्थान आहे, हे लक्षात घेऊन अगरबत्ती निर्मितीमध्ये वेगवेगळे गंध विकसित करण्यासाठी कन्नौज येथे एक ‘उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यात येत आहे. या कार्यक्रमामुळे जवळपास १५०० कारागिरांना ताबडतोब लाभ मिळणार आहे. त्यांना उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध होणार आहे. यासाठी जे स्थलांतरित कामगार आहेत आणि हाताने अगरबत्ती तयार करण्याचे काम सध्या करीत आहेत, त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)