पांडुरंग बालकवडे, सचिव, भारत इतिहास संशोधक मंडळ
बाबासाहेबांनी गेली पाऊणशे वर्षं ‘राजा शिवछत्रपती’ हे शिवचरित्र, ‘जाणता राजा’ हे महानाट्य आणि आपल्या शिवचरित्रावरील हजारो व्याख्यानांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचं अद्भुत चरित्र देशासमोरच नव्हे, तर जगापुढे आणण्याचा अविरत प्रयत्न केला. अगदी लहान वयातच बाबासाहेबांचा भारत इतिहास संशोधक मंडळाशी संबंध आला. बाबासाहेबांचे वडील मोरश्वर पुरंदरे हे इतिहासाचे शिक्षक. त्यामुळे इतिहासप्रेमाचं बाळकडू त्यांना लहान वयातच मिळालं. प्रामुख्याने ग. ह. खरे यांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला. इतिहास हे पुराव्याचं शास्त्र आहे आणि आपल्याला शिवचरित्राचा किंवा मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असेल, तर इतिहासाची साधनं समजून घ्यावी लागतील, अशी जाणीव त्यांच्या मनात निर्माण झाली. इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी मोडी, पर्शियन त्याचबरोबरच पोर्तुगिज, फ्रेंच, डच आणि इंग्रजी या भाषा शिकाव्या लागतील, त्यातली साधनं समजावून घ्यावी लागतील हे बाबासाहेब जाणून होते. या जाणिवेतूनच त्यांच्यातला इतिहास संशोधक साकारत होता.
बाबासाहेबांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी भारत इतिहास संशोधन मंडळाकडे असलेली मोडी लिपीतली अनेक कागदपत्रं अभ्यासून १९४७च्या त्रैमासिकामध्ये मराठ्यांच्या इतिहासावर नव्याने प्रकाश टाकणारी २८ कागदपत्रं प्रसिद्ध केली. त्यामध्ये माळवा, बुंदेलखंड, गुजरात या प्रदेशांमध्ये मराठ्यांनी घातलेला सत्तेचा पाया आणि केलेला संघर्ष मांडण्यात आला होता. बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा, शिंदे, होळकर, पवार, गायकवाड आणि दाभाडे या घराण्यांच्या कार्यावर आणि संघर्षावर त्यांनी नव्याने प्रकाश टाकला होता. त्यानंतरच्या काळात पानीपत, राक्षसभुवनची लढाई आणि १७९५मधला मराठ्यांचा निजामाविरुद्धचा अखेरचा यशस्वी संघर्ष म्हणजेच खर्ड्याची लढाई या संदर्भातली पत्रं प्रसिद्ध केली. या पत्रांचा अभ्यास केल्यावर आपल्याला इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांच्या अभ्यासाचं महत्त्व कळून येतं. बाबासाहेबांनी त्यानंतर शिवचरित्राच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि त्यातून शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित अनेक कथासंग्रह प्रकाशित केले. त्याचबरोबर कान्होची जेधे, बाजी सर्जेराव जेधे, पिलाजी गरळ, नावजी बलकवडे अशा अनेक ऐतिहासिक आणि अज्ञात वीर पुरुषांची चरित्रं प्रकाशात आणली. ही त्यांनी केलेली खूप मोठी सेवा आहे. त्यानंतर त्यांनी शिवचरित्र लेखनाला सुरुवात केली आणि संपूर्ण पुराव्यांनी साकारलेलं तसंच आपल्या प्रतिभेने साकारलेलं, सामान्यांना भावणारं शिवचरित्र लिहिलं. जवळपास गेली पाऊणशे वर्षं मराठी माणसावर या शिवचरित्राची मोहिनी आहे. या शिवचरित्राच्या लाखो प्रती आजवर वितरित झाल्या आहेत, लोकांच्या घरात पोहोचल्या आहेत.
बाबासाहेबांनी आपल्या अमोघ वाणीने दिलेल्या हजारो व्याख्यानांमधून शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचवलं. यासाठी त्यांनी प्रचंड पायपीट केली. दळणवळणाची साधनं नसलेल्या ठिकाणी सायकलवरून प्रवास केला. गडकोटांवर आपला देदीप्यमान इतिहास घडला असल्यामुळे ती आमची स्मारकं आहेत, आमची प्रेरणास्थानं आहेत, अशी बाबासाहेबांची भावना होती. हजारो तरुणांच्या मनात या गडकोटांबद्दल प्रचंड अभिमान आणि प्रेम निर्माण केलं. आपण गडकोटांचं पावित्र्य जपलं पाहिजे, असा संदेश बाबासाहेबांनी शिवभक्तांना आणि दुर्गप्रेमींना दिला. बाबासाहेबांनी शिवचरित्राच्या निर्मितीच्या निमित्ताने जगभर प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांच्या असं लक्षात आलं की, युरोप, अमेरिकेत अलेक्झांडर, ज्युलियन सीझर, नेपोलियन अशा आदर्शांवर महानाट्यं होत आहेत. त्यामुळे या सगळ्यांपेक्षा कांकणभर श्रेष्ठ असणाऱ्या महान शिवाजी महाराजांवर एखादं महानाट्य का बरं असू नये, असा विचार त्यांच्या मनात आला आणि याच प्रेरणेतून त्यांनी ‘जाणता राजा’ या महानाट्याचं लेखन केलं आणि त्याची निर्मिती केली. या महानाट्यामध्ये शेकडो कलाकारांसह हत्ती, घोडे, उंटही असतात. ‘जाणता राजा’ हे भारतातलं भव्य-दिव्य असं महानाट्य बाबासाहेबांनी साकारलं. या महानाट्याचे प्रयोग फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशातच नव्हे तर अगदी सातासमुद्रापारही झाले. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची महती संपूर्ण जगापर्यंत पोहोचली.
बाबासाहेबांनी आपल्या भ्रमंतीदरम्यान युरोप, अमेरिकेतली भव्यदिव्य स्मारकं बघितली. त्याच पद्धतीने शिवछत्रपतींचंही चिरंतन राहणारं, भव्य-दिव्य स्मारक निर्माण करावं, असं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं आणि त्यातून पुण्याजवळ आंबेगाव येथे शिवसृष्टीच्या निर्मितीला सुरुवात केली, त्याचा ध्यास घेतला. त्यासाठी ‘जाणता राजा’च्या माध्यमातून मिळणारं सगळं मानधन, उत्पन्न या शिवसृष्टीच्या निर्मितीसाठी दिलं. बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळे आज आंबेगाव येथे २७ एकर परिसरात भव्य-दिव्य शिवसृष्टी आकाराला येते आहे. ‘जाणता राजा’च्या प्रयोगासाठी येथे नाट्यगृह असणार आहे. त्याचबरोबर शिवकालीन शस्त्र, नाणी, अन्य वस्तू, मूर्ती अशा वस्तूंचं एक संग्रहालयही उभारलं जाणार आहे. तसंच इथे एक ग्रंथालयही असेल. शिवाजी महाराजांवरचं प्रत्येक पुस्तक इथल्या ग्रंथालयातही असावं आणि हे ग्रंथालय म्हणजे शिवाजी महाराजांवरील अभ्यासाचं एक प्रमुख केंद्र ठरावं, असा त्यांचा ध्यास होता आणि या ध्यासातूनच ही शिवसृष्टी आकाराला येते आहे.
बाबासाहेबांनी अलीकडेच वयाच्या शंभराव्या वर्षांत पदार्पण केलं होतं. या वयातही त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. दसऱ्याला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याचं ठरलं आणि त्यांच्या शुभ हस्ते मंडळाच्या चार प्रकल्पांचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळेस मंडळाचा सचिव म्हणून बाबासाहेबांना भेटण्याचा योग मला आला. त्यावेळी बाबासाहेबांची मंडळावर असणारी अपार श्रद्धा मला दिसून आली. तसंच आपण सुरू केलेलं कार्य पूर्णत्वाला न्यावं ही जिद्द त्यांच्यात दिसून आली. शिवसृष्टीचं कार्य पूर्णत्वाला जाईपर्यंत मला मृत्यूने आपल्यापर्यंत येऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. आजच्या या एकविसाव्या शतकात मराठ्यांचा इतिहास किंवा हे शिवचरित्र सांगण्यामागचा आपला उद्देश काय आहे, तर साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी समाजात एक राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केलं आणि या राष्ट्रीय चारित्र्याच्या माध्यमातून एक आदर्श समाज घडवण्याचा प्रयत्न केला.
१९४७मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं. लाखो लोकांच्या त्यागातून, बलिदानातून मिळालेलं हे स्वातंत्र्य आपल्याला अविरत टिकवायचं आहे आणि हा देश पुन्हा एकदा गौरवशाली, वैभवशाली आणि विज्ञाननिष्ट करायचा आहे. यासाठी शिवाजी महाराज आणि शिवचरित्र ही आपली प्रेरणा आहे. बाबासाहेब म्हणायचे की, ३५० वर्षांपूर्वी जगभरात सगळीकडे राजेशाही असताना शिवाजी महाराजांनी आजच्या लोकशाहीला आदर्श वाटावं, असं स्वराज्य आणि सुराज्य घडवलं. आजच्या जगातल्या कोणत्याही लोकशाही राष्ट्रासाठी, समाजासाठी शिवाजी महाराज हे आदर्श आहेत, हे जगाला पटवून द्यायला हवं. तसंच आपल्या समाजात जागृती निर्माण करणं हा माझ्या या सगळ्या कार्याचा उद्देश आहे. आपल्या गौरवशाली इतिहासातून चांगल्या गोष्टींसोबतच आपल्या पूर्वजांच्या चुकाही समजून घ्यायच्या असतात. त्यातून आपण शहाणपण शिकायचं असतं, अशी बाबासाहेबांची भावना होती. त्याचसाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
आज बाबासाहेब आपल्यात नाहीत. त्यांचं शंभर वर्षांचं आयुष्य आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. माझा आणि त्यांचा गेल्या ५०-६० वर्षांचा ऋणानुबंध होता. मी अगदी लहान वयात वडिलांसोबत बाबासाहेबांना भेटलो आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन कार्य करतो आहे. बाबासाहेब ही माझी प्रेरणा आहे आणि बाबासाहेबांच्या प्रत्येक भेटीत मला नवी प्रेरणा मिळायची. बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली!