मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई हायकोर्टाने आर्यन खान जामीन अर्जावर महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. ‘आर्यन खानच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅट्स पाहिल्यास त्यात काहीही आक्षेपार्ह दिसत नाही आणि आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट व मुनमुन धमेचा या तिघांनी कोणतेही कट कारस्थान रचल्याचे त्यातून स्पष्ट होत नाही. याविषयीच्या एनसीबीच्या आरोपात तथ्य दिसत नाही’, असे मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी म्हटले आहे.
‘तिन्ही आरोपी बेकायदा कृत्य करण्याच्या सामायिक हेतूने एकत्र जमले, हे दाखवणारा कोणताही सकारात्मक व ठोस पुरावा एनसीबीने दाखवलेला नाही. उलट आर्यन खान व अरबाझ मर्चंट आाणि मुनमुन धमेचा यांनी स्वतंत्रपणे प्रवास केला आणि संबंधित गुन्हा करण्यासाठी ते मनाने एकत्र आले नव्हते, असेच एनसीबीच्या आतापर्यंतच्या तपासातून दिसते’, असे न्यायमूर्ती सांब्रे यांनी निरीक्षण नोंदवले आहे.
‘तपासाच्या या टप्प्यावर कटकारस्थानाचा आरोप स्पष्ट होत असल्याचे दाखवण्यासाठी उच्चस्तरीय पुरावे दाखवण्याची आवश्यकता नसते, असे एनसीबीतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी म्हटले. ते बरोबर आहे. परंतु, कारस्थानाचा आरोप दाखवण्यासाठी किमान मूलभूत पुरावे तरी दिसायला हवे आणि त्याविषयी न्यायालयाने संवेदनशील असणे आवश्यक आहे. अर्जदार हे निव्वळ प्रवासासाठी क्रूझवर होते, हा एनडीपीएस कायद्यातील कटकारस्थानाचा आरोप लावण्यासाठी आधार होऊ शकत नाही’, असे न्यायमूर्ती सांब्रे यांनी म्हटले आहे. जामिनाविषयीच्या आदेशाची सविस्तर प्रत काल उपलब्ध झाल्यानंतरचे हायकोर्टाचे हे निरीक्षण म्हणजे एनसीबीला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी २८ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला जामीन मंजूर केला होता. त्याविषयीच्या मुख्य आदेशाची प्रत त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी दुपारी उपलब्ध केली. त्यानंतर जामिनासाठी हमीदार देण्याची व अन्य कायेदशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने आर्यनला ती रात्रही तुरुंगात काढावी लागली. त्यानंतर ३० ऑक्टोबरला आर्यन तुरुंगातून बाहेर आला.