क्वालालंपूर (वृत्तसंस्था) : भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या पी.व्ही. सिंधूला इंडोनेशिया मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. जपानच्या अव्वल मानांकित अकेनी यामागुचीकडून तिला ३२ मिनिटांत १३-२१, ९-२१ असा पराभवाचा पत्करावा लागला.
या सामन्यापूर्वी सिंधूचा यामागुचीविरुद्ध १२-७ असा इतिहास होता. टोक्यो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने यामागुचीला पराभूत केले होते. आणि टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला होता. मात्र, शनिवारी झालेल्या सामन्यात सिंधूचा प्रभाव दिसला नाही. तिसरी मानांकित सिंधू अपेक्षित फॉर्ममध्ये नसल्याचे दिसून येत होते. दोन्ही सेटमध्ये तिची कामगिरी सुरुवातीपासूनच खालावत गेल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने काही काळ आघाडी घेतली, पण यामागुचीने शानदार पुनरागमन करत तिला संधी दिली नाही.
टोक्योमध्ये सिंधूने कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या ही बिंग जिआओचा पराभव करून आपले दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकले. याआधी सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. रिओमध्ये सिंधूला अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मरिनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
सिंधूच्या पराभवानंतर इंडोनेशिया मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटनमध्ये भारताच्या आशा किदम्बी श्रीकांतवर टिकून आहेत. त्याने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याची गाठ डेन्मार्कच्या तिसऱ्या मानांकित अँडर्स अँटोनसेनशी लढेल.