आमदार नितेश राणे यांचा एसटी अधिकाऱ्यांना इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : गरीब एसटी कामगारांवर निलंबनाची कारवाई करून भीती दाखविण्याचे प्रकार थांबवा. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही एसटी कामगारांचे निलंबन केलेत, तर याद राखा. निलंबनाचे आदेश रद्दबातल करा. संप शांततेत सुरू आहे, कामगार आपल्या हक्काची लढाई लढत आहेत, त्याला डिवचू नका. सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला.
एसटी कामगारांनी आमदार नितेश राणे यांची त्यांच्या कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली असता एसटीचे विभाग नियंत्रक रसाळ यांना फोन करून समज दिली आणि यापुढे निलंबनाची भीती कामगारांना घालू नका, असे बजावले. न्याय हक्कांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा शांततेत सुरू असलेल्या संपाला महामंडळाचे अधिकारी गालबोट लावत असल्याचे आज उघड झाले.
आजवर २५ एसटी कर्मचाऱ्यांना कामावरून निलंबित करण्याचे आदेश विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिले. मात्र, अशा निलंबन आदेशाला भीक घालू नका. आपल्या भूमिकेवर ठाम राहा. भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी आहे. हा लढा नक्की यशस्वी होईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.