मुंबई (प्रतिनिधी) : १० डिसेंबर रोजी विधान परिषदेसाठी मुंबई महानगरपालिका मतदार संघातून होणारी निवडणूक प्रक्रियेत विद्यमान महानगरपालिकेतील सर्व नगरसेवक व नामनिर्देशित नगरसेवक यांचा समावेश असल्याने नामनिर्देशित नगरसेवकांनाही मतदानाचा अधिकार असणार आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचे २२७ निर्वाचित नगरसेवक आणि ५ नामनिर्देशित नगरसेवक असे एकूण २३२ नगरसेवक यांचा मतदार यादीत समावेश आहे. यापैकी तीन जागा रिक्त असून त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाचे नगरसेवक पद रद्द झाले आहे, तर भाजपच्या सुनील यादव व डॉ. राम बारोट या दोन नगरसेवकांचे निधन झाले असल्याने एकूण मतदार २२९ राहिले आहेत. या निवडणुकीत पहिल्या फेरीत जिंकण्यासाठी उमेदवाराला किमान ७७ मतांचा कोटा आवश्यक आहे. शिवसेनेकडे ९९ नगरसेवक मतदार आहेत, तर भारतीय जनता पक्षाकडे ८३ नगरसेवक आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीतच शिवसेना व भाजपचा उमेदवार विजयी होण्यासाठी कोणतीच अडचण नाही. सध्या भाजप ८३, शिवसेना ९९, काँग्रेस ३०, राष्ट्रवादी ८, समाजवादी पार्टी ६ मनसे १ आणि एमआयएम २ असे पालिकेचे पक्षीय बलाबल आहे.
विधान परिषदेसाठी भाजपतर्फे राजहंस सिंग यांना उमेदवारी
मुंबई महानगरपालिकेतून विधान परिषदेवर पाठवण्यात येणाऱ्या दोन जागांसाठी पुढील महिन्यात १० तारखेला निवडणूक होणार आहे. मात्र पालिकेत शिवसेना व भाजपकडे मतदानाचा पूर्ण कोटा असल्याने त्यांचे उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी होणार आहेत. भाजपतर्फे माजी आमदार, नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबई भारतीय जनता पक्षाचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून राजहंस सिंग यांच्याकडे पाहिले जाते. मुंबई भारतीय जनता पक्ष आयोजित मुंबईतील चौपाल कार्यक्रमात त्यांची भूमिका अग्रेसर राहिली आहे. रूबाबदार व्यक्तिमत्त्व, मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि जोरदार भाषणशैली, अत्यंत कुशाग्र बुद्धी अशी त्यांची ओळख आहे.