नवी मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छता अभियान अंतर्गत सर्वेक्षणात नवी मुंबई मनपाने चौथ्या क्रमांकावर आपली मोहोर उमटवली आहे. परंतु सर्वसमावेशक प्रथम श्रेणीतील प्रथम क्रमांकाचा मान हुकल्याने सफाई कामगार हळहळ व्यक्त करत आहेत.
झिरो कचरा कुंडी, हागणदारीमुक्त शहर, कचरा वर्गीकरण यामध्ये मनपा अग्रेसर होती व आहे; परंतु इतके करूनही मनपा चौथ्या क्रमांकावर फेकली गेल्याने सफाई कामगारांना भावना अनावर झाल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेली मनपा यावर्षी एका स्थानाने कमी होऊन चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.
केंद्र शासनाकडून आज जाहीर झालेल्या क्रमांकात प्रथम, द्वितीय व तृतीय शहरात अनुक्रमे इंदौर, सुरत व विजय वाडा या महापालिकेने आपले वर्चस्व राखले आहे. तर चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई मनपाने मोहोर उमटवली आहे. परंतु दहा ते चाळीस लोकसंख्या असणाऱ्या मनपात मात्र सर्वात स्वच्छ शहराच्या पुरस्काराने नवी मुंबईला सन्मान प्राप्त झाला आहे. स्वच्छता अभियान सर्वेक्षणास सुरुवात झाल्यापासून नवी मुंबई महानगरपालिका ही राज्यात प्रथम क्रमांकावरच अढळ आहे.
यावर्षी आम्हाला आपला क्रमांक येईल याची खात्री होती. त्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत घेतली. घरोघरी जाऊन स्वच्छतेबाबत जनजागृती केली, पण तरीही आम्ही चौथ्या क्रमांकावर फेकलो गेलो याचे दुःख वाटते. – पी. आर. जाधव, सफाई कामगार
झिरो कचरा कुंडी मोहीम राबविण्यास सुरुवात झाल्यावर आम्ही कचरा कुंडी जिथे ठेवली होती. तिथे थांबून कोणीही कचरा टाकणार नाही, याची खबरदारी घेत होतो. जरी आता अपयश आले असले तरी पुढे आम्ही यापेक्षा जास्त काम करू व नवी मुंबई मनपाला पहिल्या स्थानावर पोहोचवू. – यू. बी. पाटील, घनकचरा विभाग