निलेश राणे यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
कुडाळ (प्रतिनिधी) : संप मोडून काढण्यासाठी सरकार सगळ्या प्रकारे प्रयत्न करणार, मात्र आपली एकजूट कायम ठेवा. भाजप तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. निलंबन करून सेवा संपवणे एवढी गोष्ट सोपी नाही. आमचा विश्वास न्यायालयावर आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना केले.
एसटी बस कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला कोणतीही सहानुभूती नाही. त्यामुळे हा संप मिटवण्यासाठी एवढे दिवस घेतले. आता हा संप मोडीत काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सोडल्या जात आहेत. मात्र तुम्ही तुमची एकजूट तशीच ठेवा. ती तुटू देऊ नका. जर ही एकजूट आता तुटली, तर तुम्हाला कधीच न्याय मिळू शकणार नाही.
परिवहन मंत्री अनिल परब यांना वाटतं की, कर्मचारी आपल्या पायापाशी येतील. पण लक्षात ठेवा, कधीही त्यांच्या पायापाशी जाऊ नका. ते आपल्या पायापाशी आले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. तुम्हाला नोकरीतून काढण्याच्या धमक्याही दिल्या जातील. पण तुमच्या या नोकऱ्यांसाठी आम्ही न्यायालयात जाऊ, असे प्रतिपादन माजी खासदार निलेश राणे यांनी केले. निलेश राणे यांनी कुडाळ एसटी स्थानकात भेट दिली तेव्हा त्यांच्यासमवेत कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे आदी उपस्थित होते.